मोमो चॅलेंज गेमचा चक्रव्यूह : जाणून घ्या सर्व धोके आणि उपाययोजना

0
मोमो चॅलेंज गेम, momo challenge game

जगभरात मोमो चॅलेंज या नावाने नवीन जीवघेणा ऑनलाईन गेम समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काय आहे मोमो चॅलेंजचा चक्रव्यूह ? यातून वाचण्याचे उपाय कोणते? याची ही सविस्तर माहिती.

गत वर्षी उघडकीस आलेल्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज या गेमने जगभरात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. रशियात यामुळे सुमारे १३० कुमारवयीनांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले होते. भारतातही काही तरूणांना यातूनच आपले आयुष्य संपविल्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. जगभरातील अनेक देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी परिश्रमपूर्वक प्रयत्न करून या गेम्सशी संबंधीत लिंक्स ब्लॉक करण्यापासून ते संबंधीतांच्या समुपदेशनापर्यंतच्या उपाययोजना करत याला आटोक्यात आणले. यानंतर आता मोमो चॅलेंज हा नवीन डेडली गेम जगभरात चर्चेचा विषय झालेला आहे. जगभरातील कोट्यवधी इंटरनेट युजर्स याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने या गेमबाबतची सांगोपांग माहिती मराठीत देण्याचा प्रयत्न आम्ही टेकवार्ताच्या माध्यमातून करत आहोत. या महाभयंकर गेमला आपण विविध टप्यांमधून समजून घेऊ शकतो.

१) मोमो चॅलेंज गेम म्हणजे नेमके काय

हा ब्ल्यू व्हेल चॅलेंजप्रमाणे एक ऑनलाईन गेम आहे. यात व्हाटसअ‍ॅप अकाऊंटच्या माध्यमातून विशिष्ट युजर्सकडून आलेले विविध चॅलेंजेस स्वीकारायचे असतात. काही ठिकाणी फेसबुक ग्रुप्समधून याचा प्रचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यातील बहुतेक चॅलेंजेस हे स्वपीडेला प्रोत्साहन देणारे असतात. यात सहभाग होणार्‍याला अतिशय भयंकर हिंसक असे व्हिडीओज, प्रतिमा अथवा अ‍ॅनिमेशन्स पाठविले जाते. यातून त्याला ब्रेनवॉश करून हिंसक कृत्यासाठी तयार केले जाते. यामुळे हा गेम खेळणारा हळूहळू आत्मनाशाच्या मार्गावर प्रचंड गतीने आगेकूच करू लागतो. यातून अर्जेंटीनात अलीकडेच एका तरूणीचा मृत्यू झाला असून यातूनच याची भयावहता समोर आली आहे.साधारणपणे स्पॅनीश भाषिक राष्ट्रांमध्ये मोमो चॅलेंजच्या घटना आढळून आल्या आहेत. तथापि, जपानसह काही युरोपिअन व आशियाई देशांमध्येही सायबरतज्ज्ञांना हा प्रकार दिसून आला आहे. यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे बनले आहे.

२) मोमो या नावाचे रहस्य काय

विख्यात जपानी शिल्पकार मिदोरी हयाशी यांनी मोमो या नावाने एक शिल्प तयार केलेले आहे. यातील शरीर हे पक्षाचे असून यावर एका अत्यंत भेसूर चेहर्‍याच्या महिलेचे तोंड लावण्यात आलेले आहे. जपानमध्ये हे शिल्प आधीच परिचयाचे झाले आहे. यावरूनच मोमो चॅलेंज हा आत्मघातकी गेम तयार करण्यात आलेला आहे. यासाठी मोमोची भयावह प्रतिमा (क्रॉप करून) वापरण्यात आलेली आहे. अर्थात या गेमशी मिदोरी हयाशी यांचा कोणताही संबंध नसून फक्त त्यांच्या शिल्पाचा वापर अत्यंत विकृत पध्दतीने करण्यात आल्याची बाब येथे लक्षात घ्यावी लागणार आहे. (तसेच मोमो नावाच्या लोकप्रिय मॅसेंजरचाही याच्याशी कोणताही संबंधीत नाहीय!) ही प्रतिमा गेम खेळणार्‍याला आज्ञा देणार्‍या व्हाटसअ‍ॅपच्या अकाऊंटवर प्रोफाईल फोटो म्हणून वापरण्यात आलेली आहे. यामुळे या चेहर्‍याने जगभरात एकच खळबळ उडवून दिली आहे.

उजवीकडे मिदोरी हयाशी यांचे मूळ शिल्प असून डाव्या बाजूला याला क्रॉप करून फक्त वरचा भाग जगभरात व्हायरल झाला असून ते भयाचे प्रतिक बनले आहे.

३) या गेमच्या जाळ्यात कुणीही कसा अडकतो

ब्ल्यू व्हेल चॅलेंजमध्ये वेबसाईट, मॅसेंजर, चॅटींग ग्रुप्स आदींच्या माध्यमातून सूत्रधार कार्यरत असे. मोमो चॅलेंज गेममध्ये मात्र विशिष्ट क्रमांकावरून सूत्रधार काम करत असतो. म्हणजे या क्रमांकाच्या व्हाटसअ‍ॅप अकाऊंटवर जाऊन मॅसेज केल्यानंतरच हा गेम खेळता येतो. कुणीही उत्कंठेसाठी असल्या प्रकारचा मॅसेज करताच या अकाऊंटवरून त्या व्यक्तीला व्हाटसअ‍ॅपवर अतिशय भयंकर व हिडीस असे व्हिडीओज, मॅसेजेस व इमेजेस येऊ लागतात. यातूनच त्या व्यक्तीला विविध टास्क दिले जातात. यातील सर्व टास्क हे हिंसेला प्रोत्साहीत करणारे असतात. हे सर्व टास्क पूर्ण करण्याचे चॅलेंज त्या गेमरला असते. यामुळे तो हळूहळू हिंसेच्या मार्गाला लागतो. यातील सर्वात शेवटचे टास्क हे अर्थातच आत्महत्येचे असते. यातील कोणतेही ‘टास्क’ पूर्ण केले नाही वा त्यात दिरंगाई केल्यास भयावह मॅसेज टाकून त्या गेमरला धमकावले जाते. त्याची गोपनीय माहिती जाहीर करण्याची ब्लॅकमेंलीगदेखील केली जाते. यामुळे तो गेमर एका चक्रव्यूहात अडकला जातो. यातून अर्जेंटीनात एका मुलीचा मृत्यू झाला असून अन्य काही संशयास्पद मृत्यूदेखील याच गेममुळे झाल्याचा संशय आहे. तर अनेक जणांना या गेमपासून परावृत्त करण्यात आले आहे.

४) यापासून बचाव कसा होणार

कोणत्याही आमिषापासून वाचायचे असल्यास ‘मनाचा ब्रेक…उत्तम ब्रेक’ हे ध्येयवाक्य खूप उपयोगात पडते. ब्ल्यू व्हेल चॅलेंजमध्येही मानसशास्त्रांनी हेच सांगितले होते. मोमो चॅलेंजमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली आहे. जगात अनेक जण उत्सुकतेपोटी अनामिक व्हाटसअ‍ॅप अकाऊंटवर मॅसेज दिल्यानंतर या चक्रव्यूहात अडकत असल्याचे दिसून आले आहे. यातील ८१ क्रमांकापासून सुरू होणारे जपानी, ५२ क्रमांकापासून सुरू होणारे कोलंबियन तर ५७ या क्रमांकापासून सुरू होणार्‍या मेक्सिकन देशांमधील व्हाटसअ‍ॅपचे काही अकाऊंट संशयास्पद आढळले असून त्यांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. यात एखादा नंबर ब्लॉक केला तर लागलीच दुसर्‍या क्रमांकावरून हे घातक मॅसेज पसरवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, मोमो चॅलेंज गेम म्हणजे सावजाने आपणहून जाळ्यात अडकवून घेण्याचा प्रकार आहे. यामुळे कुणीही मनाशी दृढ निश्‍चय केल्यास तो या गेमच्या आमिषात कधीही फसणार नाही. आणि फसला तरी तो यातून अगदी सहीसलामत बाहेर पडू शकतो. यामुळे यापासून घाबरण्याची जराही आवश्यकता नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे व्हाटसअ‍ॅपवर कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून भयसूचक व्हिडीओ वा प्रतिमा आल्यास त्या क्रमांकाला तातडीने ब्लॉक करून पोलिसात सूचना देणे हे केव्हाही उत्तम. अशा अकाऊंटवरून येणार्‍या लिंकमध्ये घातक व्हायरसची शक्यतादेखील असल्यामुळे थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

५) संवाद महत्वाचा

ब्ल्यू व्हेल चॅलेंजमध्ये एकलकोंड्या स्वभावाचे टिन एजर्स जास्त बळी गेल्याचे दिसून आले आहे. मुळातच पौगंडावस्थेचा कालखंड हा खूप विचीत्र असतो. शरीर आणि मनातील बदलांमुळे कुणीही गोंधळून जात असतो. याच वयात फँटसी भुरळ घालत असते. परिणामी कुणीही आपल्या भोवतालापासून पळ काढून आभासी विश्‍वात रममाण होण्याचा प्रयत्न करत असतो. यातच मोमो चॅलेंजसारख्या गेमच्या माध्यमातून आयुष्यात थ्रील आल्याची अनूभुती घेता येत असते. यातून कुणीही अशा गेमच्या नादी लागल्यास त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावाचून राहत नाही. यासाठी बालके व कुमारवयीनांशी पालकांनी संवाद साधणे महत्वाचे असते. घर वा घराबाहेर सुसंवाद असल्यास कुणीही मोमो चॅलेंजसारख्या विकृतीला बळी पडणार नाही. स्मार्टफोन हा संवाद आणि ज्ञान-माहिती व मनोरंजनासाठी उपयुक्त असला तरी याची हिडीस बाजू मोमो चॅलेंजसारख्या गेममधून समोर आलेली आहे. मात्र काळजी घेतल्यास या विकृतीला हातभर लांब ठेवणे अगदी सहजशक्य आहे हे आपण लक्षात घ्यावे ही विनंती.

वैधानिक सूचना :- मोमो चॅलेंज गेमशी संबंधीत अनेक बाबी प्रामुख्याने यातील संशयास्पद मोबाईल क्रमांक आम्ही मुद्दाम या लेखात दिलेले नाहीत. यातून कुणीही या भयंकर प्रकाराला बळी पडू नये यासाठी हे पथ्य पाळण्यात आले आहे. कृपया आपण स्वत:ही या विकृतीला बळी पडू नका आणि कुणी यात वाहवत जात असल्यास त्याचे प्रबोधन करावे हीच अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here