मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंग गॅलेक्सी एस९

0
सॅमसंग गॅलेक्सी एस९चे लीक झालेले छायाचित्र.

सॅमसंग कंपनीचा आगामी सॅमसंग गॅलेक्सी एस९ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन पुढील महिन्यात बार्सिलोना शहरात होणार्‍या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.

आयफोनच्या नवीन आवृत्तीला आव्हान देण्यासाठी सॅमसंग कंपनी लवकरच आपला सॅमसंग गॅलेक्सी एस९ हा स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे मानले जात होते. या अनुषंगाने सध्या लास व्हेगास शहरात सुरू असणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो म्हणजेच सीईएस-२०१८मध्ये या मॉडेलची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र आता हा फ्लॅगशीप स्मार्टफोन २६ फेब्रुवारीपासून बार्सिलोना शहरात सुरू होणार्‍या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात येणार आहे. सॅमसंग कंपनीच्या मोबाईल विभागाचे प्रमुख डीजे कोह यांनी सीईएस-२०१८ मधील पत्रकार परिषदेत जाहीर केले. यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एस९च्या लाँचींगचा मुहूर्त ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस९ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस९ प्लस या दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.

विविध लीक्सच्या माध्यमातून सॅमसंग गॅलेक्सी एस९ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस९ प्लस या स्मार्टफोन्सचे फिचर्स जगासमोर आले आहेत. यात ५.८/६.२ इंच आकारमानाचे स्क्रीन्स, ड्युअल कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ८४५ अथवा एक्झीनॉस ९ प्रोसेसर, ६ जीबी रॅम आदींचा समावेश असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here