मोझिलाचे फाईल शेअरिंग टुल

0

मोझिलाने सेंड या नावाने फाईल शेअरिंग सेवा सुरू केली असून याच्या माध्यमातून तब्बल एक जीबीपर्यंतच्या फाईल्स सहजपणे पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

फाईल शेअरिंग हा आपल्या डिजीटल आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. अगदी व्हाटसअ‍ॅपसारख्या मॅसेंजरपासून ते विविध ई-मेल्स आणि फाईल शेअरिंग टुल्स यासाठी उपलब्ध आहेत. यातील वुई ट्रान्सफर, गुगल ड्राईव्ह आदींसह काही साधने ही अतिशय सुलभ आणि उपयुक्त असली तरी प्रत्येकात काही तरी उणीव आहेच. या पार्श्‍वभूमिवर मोझिला कंपनीने सेंड या नावाने फाईल शेअरिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा एक वेब बेस्ड क्लायंट आहे. यातून होणार्‍या फाईल्सचे वहन हे एनक्रिप्टेड असल्यामुळे ते अतिशय सुरक्षित असे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संबंधीत फाईल ही समोरच्या व्यक्तीने डाऊनलोड केल्यानंतर ती कंपनीच्या सर्व्हरवरून आपोआप नष्ट होते. अथवा डाऊनलोड न केल्यास २४ तासांत ही फाईल नष्ट होते. अर्थात या माध्यमातून कोणताही पुरावा राहत नसून या पध्दतीने केलेले फाईल शेअरिंग हे अतिशय सुरक्षित असेच असल्याचा कंपनीचा दावा आहे.

मोझिला शेअर ही सुविधा वापरण्यासाठी खूप सोपी आहे. यात आपल्याला हवी ती फाईल संगणकामधून सिलेक्ट करावी लागते. यानंतर ही फाईल अपलोड करण्यात येते. ती पूर्णपणे अपलोड झाल्यानंतर ही फाईल शेअर करण्याजोग्या लिंकमध्ये परिवर्तीत होते. ही लिंक ई-मेलच्या सहाय्याने समोरील व्यक्तीस पाठविता येते. अर्थात तो याला डाऊनलोड करू शकतो. सध्या ही सेवा प्रयोगात्मक म्हणजेच बीटा अवस्थेत असली तरी तिचा वापर करता येतो. यात काही सुधारणा करून लवकरच याचे अधिकृत लाँचिंग होऊ शकते. दरम्यान, यासोबत मोझिला कंपनी फायरफॉक्स नोटस् आणि व्हॉइस फिल टुल्स आदी सेवादेखील लवकरच सादर करणार आहे. यातील पहिल्यात नोटस् काढण्याची तर दुसर्‍यात परिणामकारक गुगल व्हाईस सर्च करण्याची सुविधा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here