मायक्रोमॅक्सचा अँड्रॉइड प्रमाणित स्मार्ट टिव्ही

0

मायक्रोमॅक्स कंपनीने अँड्रॉइड प्रमाणित स्मार्ट टिव्ही भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून याला दोन आकारमानांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

स्मार्टफोनच्या बाजारपेठेत मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन करत टॉप-५ उत्पादकांमध्ये स्थान मिळवले आहे. यासोबत अन्य उपकरणांच्या क्षेत्रातही कंपनीने आक्रमक रणनिती आखल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने मायक्रोमॅक्सने अँड्रॉइड प्रमाणित स्मार्ट टिव्ही बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. हे मॉडेल ४९ आणि ५५ इंच आकारमानाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या दोन्हींचे मूल्य अनुक्रमे ५१,९९० आणि ६१,९९० रूपये आहे. या दोन्ही व्हेरियंटमध्ये एचडीआर म्हणजे हाय डायनॅमिक रेंज या प्रणालीचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यामुळे यावर अतिशय सजीव अशा चलचित्रांची अनुभूती घेता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

वर नमूद केल्यानुसार हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइड प्रमाणित (सर्टीफाईड) आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. यावर गुगलच्या विविध सेवांचे संच देण्यात आलेला आहे. यात प्ले स्टोअर, गेम्स, म्युझिक, मुव्हीज आदींचा समावेश आहे. यातल्या प्ले स्टोअरवरून कुणीही आपल्याला हव्या असणार्‍या अ‍ॅपला इन्स्टॉल करून याचा वापर करू शकतो. याला गुगल असिस्टंट व इनबिल्ट क्रोमकास्टची जोड देण्यात आलेली आहे. यामुळे यात व्हाईस सर्च तसेच स्मार्टफोनवरील कंटेंट टिव्हीवर पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये फोर-के युएचडी म्हणजे ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर ए५३ हा प्रोसेसर असणार आहे. याची रॅम २.५ जीबी तर १६ जीबी स्टोअरेज दिलेले आहे. डॉल्बी आणि डीटीएस तंत्रज्ञानाने सज्ज असणारे यात प्रत्येकी १२ वॅट क्षमतेचे दोन स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत. हे स्मार्ट टिव्ही देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here