महिलांचा मोबाईल क्रमांक सुरक्षित ठेवण्यासाठी व्होडाफोन सखी पॅक

0

व्होडाफोनने आधी जाहीर केल्यानुसार मोबाईल क्रमांक उघड न करतांना रिचार्ज करण्यासाठी व्होडाफोन सखी पॅक कार्यान्वित केला आहे.

मोबाईल रिचार्ज करतांना संबंधीत दुकानदाराला क्रमांक सांगावा लागतो. अनेकदा रिचार्ज करणारे महिलांचा क्रमांक नोट करून नंतर त्यांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. एवढेच नव्हे तर उत्तरप्रदेशात तरूणींचे मोबाईल क्रमांक त्यांच्या सौंदर्यानुसार इतरांना विकले जात असल्याची धक्कादायक बाबदेखील समोर आली होती. या पार्श्‍वभूमिवर व्होडाफोन कंपनीने काही दिवसांपुर्वी आपण महिलांना त्यांचा मोबाईल क्रमांक दुकानदाराला न देता रिचार्ज करण्याची सुविधा देणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार आता व्होडोफोन सखी पॅक जाहीर करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत कुणीही महिला १२६०४ या क्रमांकावर प्रायव्हेट हा संदेश पाठवून ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड मिळवू शकेल. हा पासवर्ड २४ तासांच्या आत रिचार्ज करणार्‍याला दिल्यानंतर ती महिला हव्या त्या रकमेचे रिचार्ज करू शकेल. यात त्या दुकानदाराला मोबाईल क्रमांक देण्याची आवश्यकता नसेल. अर्थात त्या महिलेचा मोबाईल क्रमांक सुरक्षित राहील. विशेष म्हणजे या माध्यमातून रिचार्ज करणार्‍या महिलांच्या अकाऊंटमध्ये झीरो बॅलन्स असला तरी त्या दहा मिनिटांपर्यंत मोफत बोलू शकतील. ही सुविधा आपत्कालीन स्थितीत उपयोगात पडू शकते. तर महिलांना तीन महिन्यापर्यंत त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत हेल्थ टिप्सची सुविधाही मिळेल. तसेच यासाठी व्होडाफोनने ५२, ७८ आणि ९९ रूपयांचे तीन विशेष पॅकही जाहीर केले आहेत. पहिल्या टप्प्यात व्होडाफोन सखी हे पॅक पश्‍चिम उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात सादर करण्यात आले असले तरी लवकरच ते महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये उपलब्ध करण्यात येतील, असे व्होडाफोनतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here