भारतात शाओमी पुन्हा नंबर वन

0
Xiaomi

शाओमी कंपनीने भारतीय बाजारपेठेतील आपला पहिला क्रमांक कायम राखला असल्याची बाब ताज्या आकडेवारीतून पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

आयडीसी म्हणजेच इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन या संस्थेने भारतीय मार्केटमध्ये पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०१८) विकल्या गेलेल्या स्मार्टफोनबाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालानुसार गत तिमाहीमध्ये भारतात तब्बल ३० दशलक्ष म्हणजेच तीन कोटी स्मार्टफोन विकले गेलेत. गेल्या वर्षीच्या याच कालखंडातील विक्रीपेक्षा यावर्षी ११ टक्क्यांची वाढ झाल्याचे यातून निदर्शनास आले आहे. हाच ट्रेंड या संपूर्ण वर्षभरात कायम राहणार असल्याचे प्रतिपादन या संस्थेने केले आहे. तसेच, पहिल्या तिमाहीचा विचार करता शाओमी कंपनी पहिल्या तर सॅमसंग दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर असणार्‍या सॅमसंगला मागे सारून शाओमीने सुमारे ३० टक्के मार्केट शेअरसह पहिला क्रमांक पटकावला आहे. तर २५ टक्के वाट्यासह सॅमसंग दुसर्‍या क्रमांकावर गेली आहे. तिसर्‍या स्थानावर ओप्पो असून विवोला चौथ्या क्रमांकावर जावे लागले आहे. पाचव्या क्रमांकावर ट्रान्ससिऑनचा प्रवेश झाला आहे. या कंपनीची मालकी असणार्‍या आयटेल, टेक्नो आणि इनफिनीक्स या ब्रँडच्या चांगल्या कामगिरीमुळे ही बाब शक्य झाली आहे.

दरम्यान, फोर-जी फिचरफोनचा विचार केला असता, जिओने ३८.४ टक्के वाट्यासह पहिला क्रमांक अबाधित ठेवला असून १०.४ टक्के मार्केट शेअरसह सॅमसंग दुसर्‍या क्रमांकावर आहे. यानंतर ट्रान्ससिऑन, लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांचा क्रमांक असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here