ब्ल्यू व्हेल गेम म्हणजे काय रे भाऊ ?

0
(प्रतिकात्मक छायाचित्र: इंटरनेटवरून साभार)

मुंबईत ब्ल्यू व्हेल गेम खेळतांना एका तरूणाचा बळी गेल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असून सायबरविश्‍वातील विकृतीची मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. या अनुषंगाने ब्ल्यू व्हेल गेम आणि त्याच्याशी संबंधीत ही संपूर्ण माहिती.

( वैधानिक सूचना:- या लिखाणाचा एकमेव उद्देश संबंधीत विकृत प्रकाराबाबत जनजागृती व्हावी हाच आहे. लेखात ब्ल्यू व्हेल गेम या भयंकर प्रकाराला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.)

अचूक मूळ समजणे अवघड

ब्ल्यू व्हेल गेम हा चॅलेंज या प्रकारातील गेम आहे. यात एक सूत्रधार आणि त्याच्या आज्ञांचे अनुकरण करणारे इतर जण अशी रचना असते. यामध्ये ५० दिवसांमध्ये ५० चॅलेंजेस पूर्ण करावयाचे असतात. यातील शेवटचे आव्हान हे अर्थातच आत्महत्येचे असते. म्हणजे या गेममधील ४९ चॅलेंज पूर्ण केल्यानंतर शेवटचे चॅलेंज म्हणून संबंधीत गेमरला आत्महत्या करण्याचे सूचित केले जाते. आणि तोवर या गेमच्या थ्रिलने पुर्णपणे झपाटलेला हा व्यक्ती अखेर शेवटच्या चॅलेंजला फशी पडून आत्महत्या करतो. ब्ल्यू व्हेल या प्रजातीतील काही मासे स्वत:ला पाण्यापासून विलग करत किनार्यावर झोकून देतात. अर्थात हे कृत्य त्यांच्या जीवावर बेतते. एका अर्थाने हे मासे आत्मघात करत असतात. याच्यापासूनच प्रेरणा (?) घेऊन या गेमला विकसित करण्यात आल्याचे विविध स्त्रोतांच्या माध्यमातून जगासमोर आले आहे. हा गेम २०१३च्या सुमारास रशियात उदयास आला असून आता युरोप, अमेरिका व दक्षिण अमेरिकेसह अनेक आशियाई व आफ्रिकन देशांमध्ये खेळला जात आहे. अर्थात आता याची व्याप्ती ग्लोबल झाली असून याच धोक्याचा इशारा आहे. कुणा एखाद्या व्यक्तीने हा गेम विकसित केल्याचे कुठलेही संदर्भ आढळून येत नाही. तथापि, फिलीप बुडकीन हा विद्यार्थी व इल्या सिदोरोव्ह या पोस्टमनला आत्मघातकी गेमबाबत अटक करण्यात आल्याचे संदर्भ रशियातील मीडियात आल्या आहेत. हे दोन्ही जण आता कारागृहात असून त्यांच्याबाबत फार जास्त माहिती उपलब्ध नसली तरी काही टिन एजर्स मुलींच्या आत्महत्येला त्यांची चिथावणी असल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यातील फिलीप बुडकीनवर १६ मुलींच्या आत्महत्येचा ठपा ठेवण्यात आला आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती सांगितली आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आत्महत्या केलेल्या मुली हा स्वत: मरणासाठी तयार असल्याचा दावा त्याने केला आहे. तर आपण पृथ्वीवरील जैविक कचरा साफ करत असल्याचेही त्याने सांगितले आहे. एका प्रकारे हा तरूण मनोविकृत वाटत असून तो या भयंकर खेळातील एक महत्वाची कडी मानला जात आहे. मात्र एकंदरीतच सोशल मीडियाची व्याप्ती पाहता ब्ल्यू व्हेल गेम नेमका कुणी आणि कसा सुरू केला ? याची अचूक माहिती कुणी सांगू शकणार नाही. किंबहुना हा अनेकांनी विकसित केलेला गेम असावा असे मानता येईल.

(फिलीप बुडकीन याच्यावर ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या माध्यमातून १६ युवतींना आत्मघातास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. छायाचित्र डेलीमेलच्या सौजन्याने.)

ब्ल्यू व्हेल गेम खेळतात कसा ?

साधारणपणे कोणताही डिजीटल गेम हा एक तर गेमिंग कन्सोल, पीसी, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, टिव्ही वा त्याच्याशी संबंधीत स्वतंत्र स्क्रीनवर खेळाला जातो. मात्र ब्ल्यू व्हेल गेम याला अपवाद आहे. हा व्हर्च्युअल आणि रिअल म्हणजेच आभासी आणि सत्य विश्‍वाचा मिलाफ असणारा खेळ आहे. फेसबुक, ट्विटर, युट्युब, व्हाटसअ‍ॅप, टेलिग्राम आदींच्या माध्यमातून नेटवर्कींग करून ब्ल्यू व्हेल गेम खेळला जातो. यात अ‍ॅडमीन (सहसा याची ओळख गुप्त असते.) हा आपल्या ग्रुपमधील विविध सदस्यांना चॅलेंज देतो. यात बहुतांश करून अनैसर्गिक वर्तनाचा समावेश असतो. म्हणजे अपरात्री उठणे, हॉरर चित्रपट पाहणे, स्वत:ला इजा करणे, प्रतिकूल स्थितीचा अनुभव घेणे आदींचा यात समावेश असतो. काही अ‍ॅप्लीकेशन्सच्या माध्यमातूनही याला खेळता येते. तथापि, हे अ‍ॅप स्मार्टफोनमधील सर्व महत्वाचा डेटा चोरत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी हे अ‍ॅप ब्लॉक केल्यास ते दुसर्‍या नावाने अवतरत असतात. या प्रकारचे अ‍ॅप एकदा का इन्टॉल केले की, ते त्या व्यक्तीचा अक्षरश: ताबा घेऊन टाकत असल्याचा दावादेखील करण्यात येत आहे. अर्थात गुगल प्ले स्टोअर अथवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर याबाबत सावधगिरी बाळगली जात असली तरी अन्य संकेतस्थळांवरून एपीके फाईलच्या माध्यमातून याला इन्टॉल करण्यासाठी उपलब्ध करण्यात येते.

माध्यम कोणते ?

ब्ल्यू व्हेल गेम हा रशियात प्रामुख्याने व्हिके.कॉम या सोशल साईटच्या माध्यमातून खेळला जातो. याला ए सायलेंट हाऊस, अ सी ऑफ व्हेल्स व वेक मी अप अ‍ॅट ४.२० ए.एम. या नावांनाही ओळखले जाते. यावर लॉगीन केल्यानंतर ब्ल्यू व्हेल गेमच्या ग्रुपशी जुडल्यास हा गेम खेळता येतो. हे गु्रप मृत्यू, आत्महत्या आदी नावांशी संबंधीत असतात. यानंतर वर नमूद केल्यानुसार यात विविध स्टेप्स पूर्ण करण्याचे आव्हान अ‍ॅडमीनतर्फे दिले जाते. हा ग्रुप बंदीस्त असल्यामुळे याची माहिती इतरांना कळत नाही. याचाच लाभ घेत विविध ग्रुप्समधून ब्ल्यू व्हेल गेम हा बिनदिक्कतपणे खेळला जातो. ङ्गव्हिके.कॉमम या साईटने ब्ल्यू व्हेल गेमशी संबंधीत अनेक ग्रुप्स बंद केले असले तरी लागलीच दुसरा ग्रुप तयार होत असल्याने या साईटसह तेथील सुरक्षा यंत्रणादेखील हैराण झाल्या आहेत. तर फेसबुकवरही सिक्रेट ग्रुप्सच्या माध्यमातून सावज हेरले जाते. आणि यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटसअ‍ॅप, ङ्गव्हिके.कॉमम आदींसारख्या माध्यमातून ब्ल्यू व्हेल गेम खेळला खरं तर मॉनिटर केला जातो. कारण खेळणारा प्रत्यक्ष आयुष्यात धोके पत्करत एकेक कथित चॅलेंज पूर्ण करण्याचा थरार लुटत असतो.

ब्रेनवॉशिंगचा प्रकार

ब्ल्यू व्हेल गेम हा विशेष करून टिन एजर्स या वयोगटाला आकर्षीत करणारा ठरला आहे. या संवेदनशील वयात एकाकीपणाला फँटसीचा आयाम जोडू पाहणारे नवतरूण आपसूकच या प्रकारच्या ग्रुपकडे ओढले जातात. काही जण यातील विकृतीला घाबरून त्याचा त्याग करतात. तर काही याला एक तर चिपकून राहतात, अथवा यातील शेवटची स्टेप म्हणजेच आत्मघात करून कथितरित्या विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करतात. अर्थात हे सारे होतांना त्यांना प्राण मात्र गमवावा लागतो. सर्वात भयंकर म्हणजे यातील प्रत्येक ङ्गलेव्हलफ पूर्ण करण्याचे पुरावे प्रतिमा अथवा व्हिडीओच्या स्वरूपात संबंधीत ग्रुप व अ‍ॅडमीनला सादर करावे लागतात. अनेक टिन एजर्सचे अशा प्रकारे आत्महत्या करण्याआधीच्या शेवटच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. काही जणांना एकेक चॅलेंज पूर्ण केल्यावर हातावर एकेक चीर मारून नंतर व्हेलची आकृती काढण्यासही सांगितले जाते. मात्र सर्वांच्याच बाबतीत हा प्रकार आढळून येत नाही. कुमारवय हे अतिशय संवेदनशील असते. शरीर व मनातील बदल आणि जगातील विसंगीत अनेक जण चुकीच्या मार्गाने जातात. यात अनेकांना नैराश्याने ग्रासले जाते. त्यांना ब्रेनवॉश करून आयुष्यातील थरार अनुभवण्याच्या नावाखाली ब्ल्यू व्हेल गेम खतपाणी घालत असतो. यातून त्यांना जीवनापेक्षा आत्मघात कसा चांगला आहे? हे मनावर ठसविण्यात येते. यातूनच काही जण याला बळी पडत असतात. परिणामी हा ब्रेनवॉशिंगचा प्रकार असल्याचे अनेक तज्ज्ञांनी मान्य केले आहे.

उपाययोजना काय?

ब्ल्यू व्हेल गेम आणि तत्सम खेळांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेले अनेक प्रयत्न फोल ठरले आहेत. कारण सोशल मीडियात आपली ओळख लपवून ग्रुप तयार करणे वा त्याचे संचालन करणे फारसे कठीण नाही. यामुळे काही ग्रुप बंद केले की, थोड्या वेळातच वेगळ्या नावाने ते अवतरत असतात. परिणामी याला कुणी बळी पडू नये म्हणून काळजी घेणे हाच एकमेव मार्ग आहे. जगातील अनेक देशांमध्ये ब्ल्यू व्हेल गेमला प्रतिकार करण्यासाठी अनेक संकेतस्थळे, ग्रुप्स आदी अस्तित्वात आले आहेत. यातून टिन एजर्सला समुपदेशन करण्यात येते. यासोबत फेसबुक, गुगल, इन्स्टाग्राम आदींसारख्या कंपन्यांनी आपापल्या साईटवरून याच्याशी संबंधीत कंटेंटवर बारकाईने नजर ठेवण्यास प्रारंभ केला आहे. अनेक पेजेस नष्ट करण्यात येत आहेत. अर्थात या कंपन्यादेखील या विषवल्लीस ठेचण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच सायबरविश्‍वात याविरूध्द मोठ्या प्रमाणात जागृती झालीय ही त्यातल्या त्या समाधानाची बाब होय. मात्र अत्यंत संवेदनशील अशा वयात एकाकी असणारे काही टिनएजर्स याला बळी पडत असल्याची बाब धक्कादायक अशीच आहे. यासाठी कुमारवयीन मुला-मुलींबाबत शिक्षक व पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेष करून ते सोशल मीडियात नेमके काय करतात? त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील वर्तनात काही बदल घडत आहेत का? ते वास्तव जगापासून दूर झाले आहेत का? याबाबत बारीक लक्ष ठेवून त्यांना समुपदेशनासह विविध प्रकारांनी आत्मघाताकडे जाण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ब्ल्यू व्हेल गेम हा नवनवीन नावांनी व विविध प्रकारांमध्ये त्यांना आकृष्ट करत आत्मघाताच्या मार्गाकडे नेऊ शकतो.

पिंक व्हेलचे प्रत्युत्तर

ब्ल्यू व्हेल गेमच्या विकृतीला उत्तर देण्यासाठी सायबरविश्‍वात अनेक सकारात्मक पाऊले उचलण्यात येत आहेत. यात सर्वात जोरदार प्रतिसाद पिंक व्हेल चॅलेंज (याला बेलिया रोझा चॅलेंजदेखील म्हटले जाते.) या नवीन गेमला मिळाले आहे. ब्ल्यू व्हेल गेमला जोरदार प्रत्युत्तर म्हणून हा गेम सुरू करण्यात आला आहे. यात विकृतीपेक्षा आनंदावर भर देण्यात आला आहे. या गेममध्ये युजरला एका आठवड्याचे टास्क देण्यात येते. यात अनेक मजेशीर बाबींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, तुमच्या जीवनातील पाच चांगल्या घटनांबाबत लिहा; तुमच्या भविष्यकालीन तीन योजनांची माहिती द्या; तुमच्या जीवनातील सर्वात आनंदी क्षणाचे रेखाटन करा आदींचा यात समावेश आहे. अर्थात यात युजरला जीवनातील आनंदाबाबत अभिव्यक्त होण्याचे सांगण्यात येते. यातून आयुष्य हे अनमोल असून ते आत्मघाताने गमावता कामा नये. नैराश्य, औदासिन्य, क्रोध, मत्सर, आत्मघात या बाबींपेक्षा क्षमा, शांती, परोपकार, दान आदी बाबी महत्वाच्या असल्याचा संदेश यात देण्यात येतो. याला इतका प्रतिसाद मिळतोय की, आता नवीन युजरला खेळण्यासाठी वाट पहावी लागत आहे. यामुळे सायबरविश्‍वात ब्ल्यू व्हेल गेमची विकृती असली तरी याला पिंक व्हेलसारख्या माध्यमातून प्रत्युत्तर मिळतेय ही समाधानकारक बाब आहे.

पहा: पिंक व्हेल चॅलेंजची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here