फेसबुक पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

0

केंब्रिज अ‍ॅनालिटीकावरून सुरू असणारा घोळ संपत नाही तोच फेसबुक पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले असून या साईटवर आता युजर्सच्या सर्व माहितीसोबत त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड तसेच एसएमएस व एमएमएसची माहिती जमा करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

डायलन मॅके या न्यूझिलंडमधील युजरने ही बाब पहिल्यांदा जगासमोर आणली असून यावर एआरएस टेक्नीकाने वृत्तांत दिला आहे. यानुसार डायलन मॅके याने गेल्या आठवड्यात फेसबुकने अधिकृतरित्या दिलेल्या माध्यमातून आपला या साईटवरील सर्व डाटा डाऊनलोड केला. यात त्याला आपल्या प्रोफाईलवरील सर्व माहितीसोबत त्याने दोन वर्षात केलेल्या कॉल्सच्या पूर्ण विवरणासह एसएमएस आणि एमएमएसची सर्व माहितीदेखील आढळून आली. यातील कॉल्सचे तर सविस्तर विवरण देण्यात आले होते. यात मॅके याने कुणाला कोणत्या वेळी कॉल केला; त्यांचे संभाषण किती वेळ झाले; त्याला कुणाचा कॉल आणि केव्हा आला; तसेच तो किती वेळ बोलला याचे सविस्तर विवरण देण्यात आल्याची धक्कादायक बाब आढळून आली. डायलन मॅके याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या सर्व प्रकाराचा गौप्यस्फोट केला.यासोबत त्याने फेसबुकवरून डाऊनलोड केलेला आपला संपूर्ण डाटा झिप फाईलच्या माध्यमातून कुणालाही डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिला.

एआरएस टेक्नीका पोर्टलला फेसबुक कंपनी अँड्रॉइड युजरच्या कॉल आणि एसएमएस रेकॉर्डची माहिती जमा करत असल्याचे दिसून आले. तर आयओएस प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन अर्थात आयफोनवरील माहिती मात्र सुरक्षित असल्याचे यातून सिध्द झाले. अँड्रॉइड प्रणालीचा वापर करतांना युजर्सच्या ज्या परमीशन्स घेण्यात येतात, त्यात कॉल आणि एसएमएस रेकॉर्डचाही समावेश असतो. नेमक्या याच तांत्रिक आडवाटेचा आश्रय घेऊन फेसबुकचे अँड्रॉइड अ‍ॅप हे संबंधीत युजर्सच्या फोन रेकॉर्डला हुशारीने जमा करत असल्याचे एसआरएस टेक्नीका पोर्टलला आढळून आले. फेसबुकच्या मुख्य अ‍ॅपसह फेसबुक लाईट आणि फेसबुक मॅसेंजरचा वापर करणार्‍या युजर्सच्या कॉल डिटेल्सची माहिती या माध्यमातून जमा करण्यात येत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

दरम्यान, एआरएस टेक्नीकाच्या या वृत्तानंतर जगभरात खळबळ उडाली असून फेसबुक प्रशासनाने यावर एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सफाई दिली. फेसबुक मॅसेंजर आणि फेसबुक लाईट अ‍ॅपला इन्स्टॉल करण्यासाठी कॉल लॉगचा अ‍ॅक्सेस मागितला जातो. याला युजरने नकार दिल्यास त्याच्या कॉल डिटेल्सची माहिती जमा केली जात नसल्याचा दावा फेसबुकने केला आहे. तसेच जे युजर्स याला परवानगी देतात त्यांच्या कॉल्सची माहिती ही अत्यंत सुरक्षित अशा सर्व्हरवर ठेवली जात असून त्याचा व्यावसायिक उपयोग करत नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here