फेसबुक डेटींग अ‍ॅपच्या आगमनाची नांदी

0

फेसबुक लवकरच डेटींग अ‍ॅप सादर करणार असून याची चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे.

या वर्षी मे महिन्याच्या प्रारंभी झालेल्या ‘एफ-८’ या वार्षिक परिषदेत मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक लवकरच डेटींग अ‍ॅप सादर करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या विद्यमान युजर्सपैकी सुमारे २० कोटी युजर्सने आपण अविवाहीत असल्याचे प्रोफाईलवर नमूद केले आहे. या साईटच्या एकूण युजर्स संख्येच्या हा आकडा जवळपास १० टक्के इतका आहे. यामुळे या मोठ्या संख्येला आकर्षीत करण्यासाठी ऑनलाईन डेटींगची सुविधा देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मार्क झुकरबर्गने केले आहे. अन्य डेटींग साईट व अ‍ॅपच्या तुलने फेसबुकवर ही सुविधा अतिशय उत्तम दर्जाची व सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुरक्षित असेल असा दावादेखील झुकरबर्ग यांनी केला होता. ही घोषणा तशी आश्‍चर्यकारक मानली गेली होती. यानंतर याबाबत नेमक्या काय घडामोडी होत आहेत याची माहिती समोर आलेली नाही. तथापि, आता ‘द व्हर्ज’ या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्तांत सादर केला असून यात या अ‍ॅपची आता चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. फेसबुक आपल्या अमेरिकेतील काही कर्मचार्‍यांच्या माध्यमातून या अ‍ॅपची चाचणी घेत असल्यामुळे याला लवकरच अधिकृतपणे लाँच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेसबुकच्या या नवीन सेवेचा विद्यमान युजर्सलाच याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रत्येक युजरला डेटींग करण्यासाठी स्वतंत्र प्रोफाईल तयार करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यमान प्रोफाईलपेक्षा जास्त माहितीचा समावेश असेल. यावर बनावट अकाऊंट तयार करता येणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. एकदा का कुणा युजरने स्वतंत्र डेटींग प्रोफाईल तयार केले की, त्याला त्याच्या न्यूज फिडमध्ये त्याच्या यादीतील मित्रांशिवाय इतरांच्या डेटींग प्रोफाईल दिसू लागतील. यापैकी कुणीही आपल्याला हव्या त्या युजरसोबत संपर्क साधून डेटींग करता येणार आहे. संबंधीत युजरच्या प्रोफाईलवर नमूद केलेल्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना मित्र-मैत्रीणी सुचविण्यात येणार आहेत. तसेच याच्याशी संबंधीत विविध इव्हेंटची माहितीदेखील त्याला मिळेल. तर आपल्या जवळच्या व्यक्तींना डेटींग प्रोफाईल दिसू नये यासाठी त्यांना ब्लॉक करण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

सध्या डेटींग करण्यासाठी उपयुक्त असणार्‍या संकेतस्थळांमध्ये टिंडर आघाडीवर आहे. आपल्या नवीन फिचरच्या माध्यमातून झुकरबर्गने आता टिंडरला तगडे आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. तर टिन एजर्समध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणार्‍या स्नॅपचॅटलाही यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here