फेसबुकवर नकारात्मक प्रतिक्रियेसाठी स्वतंत्र बटन

0

गेल्या काही महिन्यांपासून प्रयोगात्मक अवस्थेत असणारे डाऊनवोट हे फिचर आता फेसबुकच्या जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात फेसबुकवर डाऊनवोट या नावाने नवीन बटन देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणीदेखील सुरू करण्यात आली होती. आता हे बटन जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने देण्यात येत आहे. मात्र डाऊनवोट म्हणजे डिसलाईक नव्हे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. खरं तर, फेसबुकवर डिसलाईकचे बटन येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. फेसबुकने मध्यंतरी रिअ‍ॅक्शन्स या फिचरच्या माध्यमातून आपल्या युजर्ससाठी लाईक या सुविधेचा विस्तार सादर केला आहे. यात इमोजींच्या मदतीने विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देता येतात. यात अद्यापही डिसलाईकचा पर्याय दिलेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकवर लवकरच डाऊनवोट ही नवीन सुविधा येण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. कारण काही युजर्सला याची चुणूक दिसून आली आहे.

डाऊनवोटसाठी फेसबुकवरील प्रत्येक कॉमेंटच्या खाली स्वतंत्र पर्याय देण्यात येणार आहे. एखाद्या प्रतिक्रियेला असंमती दर्शविण्यासाठी डाऊनवोट उपयोगात येणार आहे. म्हणजे एखादी कॉमेंट ही असभ्य वा संकेताला धरून नसल्यास कुणीही याला डाऊनवोट करू शकणार आहे. यातून संबंधीत कॉमेंट ही फ्लॅग करता येणार आहे. अर्थात याबाबत फेसबुकला ती कॉमेंट हटविण्याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. या माध्यमातून फेक न्यूज अथवा आक्षेपार्ह कंटेंटला हटविण्यास मदतदेखील होणार आहे. सध्या फेसबुकच्या कोणत्याही पोस्टवरील कॉमेंटच्या खाली लाईक आणि रिप्लाय हे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. याच्याच बाजूला डाऊनवोट हे बटन असणार आहे. काही युजर्सला हे बटन दिसू लागले असून इतरांना क्रमाक्रमाने याला प्रदान करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here