फेसबुकवर जाहिरातींचाही रिव्ह्यू करण्याची सुविधा

0

फेसबुकने आपल्या संकेतस्थळावरून प्रसिध्द होणार्‍या जाहिरातींचा रिव्ह्यू लिहण्याची सुविधा आता युजर्सला दिली असून या माध्यमातून अवास्तव दावे करणार्‍या जाहिरातींचा चाप बसणार आहे.

फेसबुकने जाहिरातदार आणि ग्राहक यांच्यात पारदर्शकता असावी यासाठी आता जाहिरातींचा रिव्ह्यू करण्याची सुविधा दिली आहे. फेसबुकने आधीच पेजबाबत रिव्ह्यू करण्याची सुविधा प्रदान केली आहे. याचप्रमाणे पेजला कुणीही रँकींगदेखील देऊ शकतो. यातच आता जाहिरातींसाठीही हीच सुविधा देण्यात आली आहे. याबाबत फेसबुकने एका पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

सोशल मीडियात फेकन्यूजसोबत अवास्तव दावे करणार्‍या जाहिरातीदेखील संवेदनशील मुद्दा बनल्या आहेत. विशेष करून काही राजकीय जाहिराती या दिशाभूल करणार्‍या असल्याचे आढळून आले आहे. तसेच बर्‍याचशा व्यावसायिक जाहीरातींमध्येही अवास्तव दावे करण्यात येत असतात. प्रत्यक्षात मात्र हे दावे फसवे असल्याचा अनुभव ग्राहकांना येतो. यामुळे फेसबुकने आता जाहिरातींचा रिव्ह्यू करण्याची सुविधा प्रदान केली आहे. याच्या मदतीने ग्राहक आता कोणत्याही जाहिरातीबाबत आपले मत व्यक्त करू शकणार आहे. यामध्ये त्या जाहिरातीबाबतचे सकारात्मक अथवा नकारात्मक मत तो मांडू शकेल. एखाद्या जाहिरातीबाबत नकारात्मक मते जास्त आल्यास फेसबुक त्या उत्पादकाला पहिल्यांदा समज देऊन गुणवत्तेत सुधार करण्याचा इशारा देणार आहे. असे करूनदेखील संबंधीत जाहीरातदाराने कारवाई न केल्यास संबंधीत जाहिरात रिमूव्ह करण्यात येणार आहे. याच्या जोडीला त्याच्या जाहिरातींच्या डिलीव्हरीत कपात करण्यात येईल. यावरही त्याने सुधारणा न केल्यास त्याचे अकाऊंट डिलीट करण्यात येणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट शब्दात नमूद केले आहे. हे फिचर अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपसह वेब आवृत्तीसाठी देण्यात आली आहे. यासाठी युजरच्या अ‍ॅड अ‍ॅक्टीव्हिटी या विभागात सुविधा प्रदान करण्यात आली आहे. कुणीही युजर https://www.facebook.com/ads/activity या लिंकवर जाऊन त्याने पाहिलेल्या जाहिरातींबाबत आपले मत व्यक्त करू शकणार आहे. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छीणार्‍यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

यासोबत फेसबुकने आपल्या जाहिरातदारांसाठी एक आदर्श नियमावलीदेखील जाहीर केली आहे. यामध्ये ग्राहकांचे परिपूर्ण समाधान करण्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबींचा सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्राहक आणि व्यावसायिकांमध्ये पारदर्शकता असावी यासाठी फेसबुक प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here