फेसबुकवरून डेटींग करण्यासाठी स्वतंत्र फिचर

0

फेसबुक लवकरच आपल्या युजर्ससाठी डेटींग करण्याची सुविधा लवकरच देणार असून यासाठी वेगळे प्रोफाईल व न्यूज फिड असणार आहे.

फेसबुकच्या वार्षीक एफ ८ या वार्षिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मार्क झुकरबर्ग याने आपल्या अतिशय विस्तृत अशा भाषणात अनेक आगामी फिचर्स व प्रॉडक्टची घोषणा केली. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे लवकरच फेसबुकवर डेटींग करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र वेबसाईट वा अ‍ॅप सुरू करण्यात येणार नसून फेसबुकच्या विद्यमान युजर्सलाच याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रत्येक युजरला डेटींग करण्यासाठी स्वतंत्र प्रोफाईल तयार करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यमान प्रोफाईलपेक्षा जास्त माहितीचा समावेश असेल. यावर बनावट अकाऊंट तयार करता येणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. एकदा का कुणा युजरने स्वतंत्र डेटींग प्रोफाईल तयार केले की, त्याला त्याच्या न्यूज फिडमध्ये त्याच्या यादीतील मित्रांशिवाय इतरांच्या डेटींग प्रोफाईल दिसू लागतील. यापैकी कुणीही आपल्याला हव्या त्या युजरसोबत संपर्क साधून डेटींग करता येणार आहे. संबंधीत युजरच्या प्रोफाईलवर नमूद केलेल्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना मित्र-मैत्रीणी सुचविण्यात येणार आहेत. तसेच याच्याशी संबंधीत विविध इव्हेंटची माहितीदेखील त्याला मिळेल. तर आपल्या जवळच्या व्यक्तींना डेटींग प्रोफाईल दिसू नये यासाठी त्यांना ब्लॉक करण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे. फेसबुकच्या विद्यमान युजर्सपैकी सुमारे २० कोटी युजर्सने आपण अविवाहीत असल्याचे प्रोफाईलवर नमूद केले आहे. या साईटच्या एकूण युजर्स संख्येच्या हा आकडा जवळपास १० टक्के इतका आहे. यामुळे या मोठ्या संख्येला आकर्षीत करण्यासाठी ऑनलाईन डेटींगची सुविधा देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मार्क झुकरबर्गने केले आहे. अन्य डेटींग साईट व अ‍ॅपच्या तुलने फेसबुकवर ही सुविधा अतिशय उत्तम दर्जाची व सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुरक्षित असेल असा दावादेखील झुकरबर्गने केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकवरील माहितीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमिवर, विविध उपाययोजना करण्यात येत असून याच्या सोबतीला डेटींग करण्याची सुविधा देण्याचा झुकरबर्गचा निर्णय हा अनेकांना बुचकळ्यात टाकणारा आहे. सध्या डेटींग करण्यासाठी उपयुक्त असणार्‍या संकेतस्थळांमध्ये टिंडर आघाडीवर आहे. आपल्या नवीन फिचरच्या माध्यमातून झुकरबर्गने आता टिंडरला तगडे आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. तर टिन एजर्समध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणार्‍या स्नॅपचॅटलाही यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या या फिचरची काही युजर्सच्या माध्यमातून चाचणी घेण्यात येत आहे. साधारणत: या वर्षाच्या अखेरीस सर्व युजर्सला डेटींग हे फिचर देण्यात येईल असे सूतोवाच मार्क झुकरबर्गने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here