फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज !

0

फेसबुकवरून आता कुणीही आपल्या मोबाईल रिचार्ज करू शकणार असून हे फिचर खास भारतीय युजर्ससाठी प्रदान करण्यात आले आहे.

फेसबुक सध्या युजर्सच्या गोपनीय माहितीच्या लीकवरून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यावर या कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्याचे सहकारी बचावात्मक पवित्रात असल्याचे दिसून येत आहेत. असे असले तरी आपल्या युजर्सला सातत्याने नवनवीन सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. या अनुषंगाने आता भारतातील युजर्सला फेसबुकवरून मोबाईल रिचार्ज करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. सध्या हे फिचर अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सलाच दिसून येत आहे.

फेसबुकच्या मोबाईल रिचार्ज फिचरचा वापर करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक अ‍ॅपची ताजी आवृत्ती अपडेट असणे आवश्यक आहे. अद्ययावत फेसबुक अ‍ॅप असणार्‍या युजर्सला वरील भागात असणार्‍या नोटिफिकेशनच्या बाजूला क्लिक केल्यावर पेजेससह अन्य विभाग दिसतील. यातील सी मोअर या पर्यायावर क्लिक केल्यावर मोबाईल रिचार्जचा विभाग दिसेल. काहींना हा विभाग मोबाईल टॉप-अप या नावाने दिसू शकतो. यावर क्लिक केल्यावर युजरला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. यानंतर त्याला पेमेंटसाठी क्रेडीट/डेबीट कार्ड असे पर्याय समोर येतील. यात आपल्याला हव्या त्या रकमेच्या रिचार्जचा आकडा भरून रिचार्ज नाऊ या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे. पेमेंटसाठी ओटीपी अथवा थ्रीडी सिक्युअर्ड पासवर्ड विचारला जातो. यानंतर युजरला रिचार्ज केल्याची रिसिट मिळते. या माध्यमातून कुणीही आपल्याला हव्या त्या कंपनीच्या मोबाईलमध्ये हव्या त्या रकमेचे रिचार्ज करू शकतो. विशेष बाब म्हणजे युजरला त्याच्या मोबाईल कंपनीने दिलेल्या विविध प्लॅन्सची माहिती देण्याची सुविधादेखील फेसबुकने केली आहे. सध्या तरी क्रेडीट अथवा डेबीट कार्डच्याच माध्यमातून मोबाईल रिचार्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यात युपीआय, नेट बँकींग अथवा अन्य कोणत्या प्रणालीचा सपोर्ट दिलेला नाही. तसेच याला कोणतेही मोबाईल वॅलेट संलग्न करण्याची सुविधादेखील दिलेली नाहीय.

(मोबाईल रिचार्जच्या प्रक्रियेचा क्रम खालील प्रतिमेत दर्शविण्यात आला आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here