फेसबुकला मागे टाकून युट्युब ही व्हिडीओ शेअरिंग सेवा उत्तर अमेरिकेत दुसर्या क्रमांकावर मुसंडी मारण्याच्या तयारीत असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वीच फेसबुकची अपेक्षेइतकी वाढ होत नसल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. यामुळे फेसबुकच्या शेअरचे मूल्यदेखील मोठ्या प्रमाणात गडगडले होते. याचा फटका मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीला बसल्याच्या बातम्या आपल्या वाचनात असतीलच. दरम्यान, आता यातील अजून एक धक्कादायक पैलू ‘सिमीलर वेब’ या रिसर्च फर्मने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आला आहे. यानुसार फेसबुकची उत्तर अमेरिकेतील वाढ ही स्थिरावली असल्याचे अधोरेखीत करण्यात आले आहे. तर दुसरीकडे युट्युब या सेवेची घोडदौड मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये फेसबुक पीछाडीवर जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सध्या फेसबुक हे अमेरिका व कॅनडामध्ये दुसर्या क्रमांकाचे संकेतस्थळ आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थातच गुगल विराजमान आहे. आता गुगलचीच मालकी असणारे युट्युब हे फेसबुककडून दुसरा क्रमांक हिरावून घेणार असल्याचे या अहवालात दिसून आले आहे. यामुळे लवकरच फेसबुक हे तिसर्या क्रमांकावर फेकले जाणार असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे सध्या तिसर्या क्रमांकावर असणारे याहू हे पाचव्या क्रमांकावर जाण्याची चिन्हे आहेत. अमेझॉन चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यतादेखील ‘सिमीलर वेब’च्या अहवालाने वर्तविली आहे.
फेसबुकने युट्युबला आव्हान देण्याचे सर्व प्रयत्न फसले आहेत. तर दुसरीकडे जगभरात युट्युबची लोकप्रियता अबाधित असून याच्या युजर्सच्या संख्येत दिवसोदिवस वाढ होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आता प्रगत राष्ट्रांमधील युजर्स फेसबुकला कंटाळल्याचे चित्र समोर आले आहे. यातील टिनएजर्स युजर्सला स्नॅपचॅट अथवा इन्स्टाग्रामची भुरळ पडली आहे. तर बहुतांश युजर्स फेसबुकऐवजी व्हाटसअॅपसह अन्य मॅसेंजर्सला प्राधान्य देतांना दिसून येत आहेत. याचा सरळ फटका फेसबुकच्या वाढीला बसणार असल्याची चिन्हे आता दिसून येत आहेत. याची सुरूवात उत्तर अमेरिकेतून होणार असल्याचा जवळपास स्पष्ट झाले आहे.