फेसबुकच्या व्हिडीओ चॅट उपकरणाची एंट्री !

0

फेसबुकने पोर्टल आणि पोर्टल प्लस या नावाने व्हिडीओ चॅट उपकरणे सादर केले असून याच्या माध्यमातून अमेझॉनच्या इको शो या डिव्हाईसला तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे.

फेसबुक लवकरच स्मार्ट डिस्प्ले सादर करणार असल्याची माहिती आधीच जगासमोर आली होती. याचे अनेक लीक्सदेखील समोर आले होते. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकने आज पोर्टल आणि पोर्टल प्लस हे दोन उपकरणे सादर करण्याची घोषणा केली आहे. यांचे मूल्य अनुक्रमे १९९ आणि ३४९ डॉलर्स आहेत. पुढील महिन्यात हे उपकरण ग्राहकांना प्रत्यक्षात खरेदी करता येणार आहे. याचवेळी याला भारतातही लाँच करण्यात येईल अशी शक्यता आहे. पोर्टल या डिव्हाईसमध्ये अनेक फिचर्स देण्यात आलेले आहेत. तथापि, याला प्रामुख्याने व्हिडीओ चॅटींगसाठी विकसित करण्यात आले आहे. यासाठी यामध्ये वाईड अँगल या प्रकारातील व्हिडीओ कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने विस्तृत क्षेत्रातील व्हिडीओ कव्हरेज होत असते. यात फेस डिटेक्शनची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. याच्या माध्यमातून कुणीही आपल्या मित्रासोबत व्हिडीओ चॅटींग करू शकतो. यातील पोर्टलमध्ये १० तर पोर्टल प्लसमध्ये १५.६ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

खर तर आता बर्‍याचशा सोशल साईट अथवा मॅसेंजरवरून व्हिडीओ चॅटींग वा कॉल्स करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी अनेक स्वतंत्र टुल्सदेखील वापरात आहेत. मात्र फेसबुकने यासाठी स्वतंत्र डिव्हाईस आणल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, यामध्ये बरेचसे उच्च फिचर्स देण्यात आलेले आहेत. व्हिडीओ चॅटींगला उच्च पातळीवरून अनुभवण्यासाठी पोर्टल आणि पोर्टल प्लस उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. पोर्टलवरून दुसर्‍या पोर्टलधारकाशी व्हिडीओ चॅटींग करता येणार आहे. अथवा समोरच्या व्यक्तीकडे फेसबुक वा फेसबुक मॅसेंजरचे खाते असणे यासाठी आवश्यक आहे. याला स्पॉटीफाय, पंडोरा आदी स्ट्रीमिंग सेवांचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे यावरून संगीताचाही आनंद घेता येणार आहे. तसेच यावरून फेसबुक वॉचवरील व्हिडीओजदेखील पाहता येणार आहे. तथापि, यात फेसबुक अथवा फेसबुक मॅसेंजर वापरण्याची थेट सुविधा देण्यात आलेली नाही. कदाचित याला अपडेटच्या स्वरूपात देण्यात येईल अशी शक्यता आहे. यामध्ये अमेझॉनचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट दिलेला आहे. याच्या मदतीने युजर व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो.

मध्यंतरी फेसबुकवरील सुरक्षा हा वादाचा मुद्दा बनला होता. विशेष करून केंब्रीज अ‍ॅनालिटीका प्रकरणात या सोशल साईटची खूप बदनामी झाली होती. या पार्श्‍वभूमिवर, पोर्टल उपकरणातूनही युजरची गोपनीय माहिती चोरली जाणार का? याबाबत आता प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. मात्र युजरने हे उपकरण बंद केल्यानंतर यातील कॅमेरा आणि मायक्रोफोन हे अगदी खर्‍या-खुर्‍या प्रकारे बंद होत असल्याचे फेसबुकने आवर्जून नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here