फेसबुकची न्यूज फिड बदलणार

0

फेसबुकने आपल्या साईटचा आत्मा असणार्‍या न्यूज फिडमध्ये बदल करण्याची घोषणा केली असून यात व्यावसायिक पोस्टला तुलनेत कमी प्राधान्य देण्यात येणार आहे.

फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर न्यूज फिड हा सर्वात महत्वाचा घटक आहे. कोणत्याही युजरचे फ्रेंड, तो फॉलो करत असलेले पेज, ग्रुप्स आदींशी संबंधीत घडामोडी त्याला त्याच्या न्यूज फिडमध्ये दिसत असतात. प्रत्येक युजर याच माध्यमातून जगाशी कनेक्ट होत असतो. यामुळे फेसबुक कंपनी न्यूज फिडबाबत अतिशय गंभीर आहे. युजरने जास्तीत जास्त वेळ आपल्या साईटवर राहून सोशल नेटवर्कींगचा आनंद घ्यावा यासाठी न्यूज फिडमध्ये जास्तीत जास्त पोस्ट, प्रतिमा, व्हिडीओ यावेत याचा फेसबुक सातत्याने प्रयत्न करत असते. न्यूज फिडसाठी फेसबुकचा स्वतंत्र अलॉगरिदम आहे. यात वेळोवेळी आवश्यक ते बदलदेखील करण्यात येतात. या अनुषंगाने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नुकत्याच एका पोस्टच्या माध्यमातून न्यूज फिड बदलण्याची घोषणा केली आहे.

यानुसार आता कोणत्याही युजरला प्रमोटेड पोस्ट, विविध बातम्यांच्या लिंक्स, पेजेसचे फिड आदींऐवजी त्याच्या न्यूज फिडमध्ये त्याच्या मित्रांशी संबंधीत पोस्ट जास्त प्रमाणात दिसतील. अर्थात युजरला खर्‍याखुर्‍या सोशल नेटवर्कींगचा आनंद घेता यावा यासाठी फेसबुक प्रयत्न करत असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. तथापि, या निर्णयाचा व्यावसायिकांना फटका बसणार आहे. यामुळे विविध फेसबुक पेजेसला युजर्सपर्यंत पोहचण्यात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. याचा फटका पर्यायाने फेसबुकच्या उत्पन्नावरदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून फेसबुकवर वेळ व्यतीत करण्याच्या कालखंडात घट झाली असून यामुळे न्यूज फिडमध्ये बदल करण्यात येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे तरी युजर जास्त वेळ या सोशल साईटवर घालवेल असा फेसबुकने अंदाज केल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here