फक्त २४९ रूपयात नोकिया ३३१०ची हुबेहुब कॉपी !

0

अलीकडेच नवीन स्वरूपात सादर झालेल्या नोकिया ३३१० या मॉडेलची हुबेहुब कॉपी असणारा हँडसेट आयकॉल कंपनीने अवघ्या २४९ रूपयाच लाँच केला आहे.

काही महिन्यांपूर्वी एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ३३१० हे मॉडेल नवीन स्वरूपात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केले होते. कधी काळी हे मॉडेल तुफान लोकप्रिय ठरले होते. तर अलीकडेच सादर करण्यात आलेल्या मॉडेललाही बर्‍यापैकी प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले होते. दरम्यान, हे मॉडेल लाँच झाल्यानंतर अत्यंत स्वस्त दरातील याचे क्लोन मॉडेल्स बाजारपेठेत अवतरले होते. नोकिया ३३१० हा फिचरफोन ३३१० रूपयात लाँच करण्यात आला होता. आता यातील जवळपास सर्व फिचर्सने युक्त असणारा फिचरफोन आयकॉल या कंपनीने आयकॉल के७१ या मॉडेलच्या माध्यमातून सादर केला आहे. याचे मूळ मूल्य ६२५ रूपये असले तरी लाँचींगसाठी याला फक्त २४९ रूपयात सादर करण्यात आले आहे. ग्राहकांना हा फोन शॉपक्लुज या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

आयकॉल के७१ या मॉडेलचा लूकदेखील नोकिया ३३१० सारखा आहे. याशिवाय यातील बहुतांश फिचर्सदेखील याचप्रमाणे आहेत. यात १.४४ इंच आकारमानाचा टिएफटी डिस्प्ले असेल. याची रॅम ३२ मेगाबाईट तर मूळ स्टोअरेज ६४ मेगाबाईट आहे. यात एलईडी टॉर्च आणि ऑडिओ जॅकदेखील असेल. अर्थात यातील बॅटरी ही नोकिया ३३१० पेक्षा कमी क्षमतेची म्हणजेच ६०० मिलीअँपिअरची असेल. हा अपवाद वगळता यातील सर्व फिचर्स समान आहेत. देशात सध्या स्वस्तात स्वस्त फिचरफोनची स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच विवा कंपनीने विवा व्ही७ हा फोन फक्त ३४९ रूपयात लाँच केला आहे. यातच आता आयकॉल के७१ हे मॉडेल अवघ्या २४९ रूपयात मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here