पॉप-अप फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज स्मार्टफोन

0
vivo-nex,पॉप-अप,फ्लॅगशीप

विवो कंपनीने खर्‍या अर्थाने फुल व्ह्यू डिस्प्ले असणारे नेक्स आणि नेक्स ए हे दोन स्मार्टफोन सादर केले असून यामध्ये पॉप-अप या प्रकारातील फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

अलीकडच्या काळात फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्लेची युजर्सला भुरळ पडली आहे. यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेत कंपन्यादेखील याला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. आयफोन-एक्स या मॉडेलमध्ये वरील बाजूस नॉच देण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट कॅमेरा, इयरपीस आदींसह प्रॉक्झीमिटी सेन्सर देण्यात आले आहे. याची अनेक कंपन्यांनी कॉपी केली आहे. मात्र विवो कंपनीने यापुढील फंडा शोधून काढत आपल्या नेक्स आणि नेक्स ए या मॉडेलमध्ये या प्रकारचा नॉच न देता खर्‍या अर्थाने फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. यात बॉडी-टू-स्क्रीन रेशो हा तब्बल ९१.२ टक्के इतका आहे. यातील वरील बाजूस इयरपिस दिलेला नाही. याऐवजी स्क्रीन साऊंडकास्टींग तंत्रज्ञानाच्या मदतीने यामध्ये डिस्प्लेमधूनच युजरला ध्वनी ऐकण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर याच्या वरील बाजूस पॉप-अपच्या स्वरूपातील फ्रंट कॅमेरा दिला आहे. अर्थात सेल्फी प्रतिमा घ्यावयाची असल्यास तो वर येत असून इतर वेळेस मात्र तो डिस्प्लेच्या वर मागील बाजूस स्मार्टफोनच्या बॉडीमध्ये दडून राहतो. या प्रकारातील हे जगातील पहिले मॉडेल ठरले आहे. हा कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर यातील मुख्य कॅमेर्‍यांमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १२ आणि ५ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील पहिल्या कॅमेर्‍यात सोनी कंपनीचे आयएमएक्स३६३ सेन्सर देण्यात आले आहे. यात एआय (कृत्रीम बुध्दीमत्ता) तसेच एचडीआर फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अन्य फिचर्सने सज्ज आहेत.

विवो नेक्स आणि नेक्स एस या मॉडेलमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. यातील फुल व्ह्यू सुपर अमोलेड डिस्प्ले हा ६.५९ इंच आकारमानाचा, १३:३:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस (२३१६ बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. तर विवो नेेक्स एस हा स्मार्टफोन मात्र क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरने सज्ज आहे. याची रॅम ८ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी १२८ आणि २५६ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन ४,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहेत. तर दोन्ही अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर आधारित फनटच ओएस ४.० या प्रणालीवर चालणारे असतील. या दोन्ही मॉडेल्समध्ये विवो कंपनीने विकसित केलेला जोवी हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आला असून यासाठी स्वतंत्र बटन दिलेले आहे. तर दोन्ही स्मार्टफोन इनबिल्ट एनर्जी युजर इंटरफेनसे युक्त असणार आहेत. विवो नेक्स आणि नेक्स एस हे स्मार्टफोन पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध करण्यात आले असून लवकरच भारतीय ग्राहकांसाठी लाँच करण्यात येतील असे संकेत मिळाले आहेत.

पहा : विवो नेक्स स्मार्टफोनची प्राथमिक माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here