पेटीएमवर थर्ड पार्टी क्युआर कोड स्कॅनींगची सुविधा

0

पेटीएम या डिजीटल पेमेंट प्रणालीत लवकरच थर्ड पार्टी क्युआर कोड स्कॅन करून व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.

पेटीएमचा उपयोग करून कुणीही क्विक रिस्पॉन्स म्हणजेच क्युआर कोड स्कॅन करत रक्कम अदा करू शकतो. पेटीएमने २०१५ साली ही प्रणाली लाँच केली असून याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या अ‍ॅपचे एकंदरीत ६५ टक्के व्यवहार हे क्युआर कोड स्कॅनींगच्या माध्यमातून होत असतात. यात पेटीएमची सेवा घेणार्‍या प्रत्येक व्यापार्‍याला क्युआर कोड दिलेला असतो. ग्राहक याला स्कॅन करून विहीत रक्कम अदा करू शकतात. डिजीटल पध्दतीने पेमेंट करण्यासाठी पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिन्सचा वापरदेखील केला जातो. मात्र या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांवर अतिरिक्त फी द्यावी लागते. या पार्श्‍वभूमिवर, पेटीएमने अगदी मोफत असणारी स्कॅन अँड पे ही प्रणाली अंमलात आणली असून याचा ग्राहकासह या कंपनीलाही लाभ झाला आहे. मात्र आजवर फक्त पेटीएमच्या स्वत:च्याच क्युआर कोडवर ही प्रणाली काम करत होती. तथापि, लवकरच थर्ड पार्टी क्युआर कोडचा वापरदेखील शक्य होणार आहे. हे थर्ड पार्टी क्युआर कोड हे मुक्तस्त्रोत अर्थात ओपनसोर्स प्रणालींचा वापर करून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठीदेखील कोणतेही अतिरिक्त चार्ज लावले जाणार नाहीत. तथापि, या माध्यमातून पेटीएमचा वापर करून अन्य प्रणालींवर आधारित पेमेंट सिस्टीमचा वापर करणे या कंपनीच्या ग्राहकाला शक्य होणार आहे. यामुळे कंपनीने यावर लक्ष केंद्रीत केले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here