पुस्तकांच्या शोधासाठी गुगलचे क्रांतीकारी टुल

0

कोणताही शब्द, वाक्य अथवा परिच्छेदासह संबंधीत पुस्तकातील कंटेंटचा शोध घेण्यासाठी गुगलने अतिशय क्रांतीकारी असे टॉक टू बुक्स हे नवीन टुल जगासमोर सादर केले आहे.

इंटरनेट सर्चच्या क्षेत्रात गुगलच्या मिरासदारीला येत्या काही वर्षांमध्ये तरी कुणी आव्हान देऊ शकेल अशी स्थिती नाहीय. गुगल सर्च हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अगदी साध्या किवर्डपासून ते अतिशय गुंतागुंतीची सर्च करण्यासाठी गुगल उपयोगात पडते. विशेष बाब म्हणजे ही सर्च प्रक्रिया विलक्षण गतीने होत असल्यामुळे युजर्सचा वेळदेखील वाचतो. अर्थात या सर्व उपयुक्त बाबींचा विचार केला तरी गुगल सर्चमध्ये काही प्रमाणात त्रुटी आहेत. खरं तर गुगलवर पुस्तकांचा शोध घेण्यासाठी https://books.google.com हा स्वतंत्र विभाग गेल्या अनेक वर्षांपासून देण्यात आला आहे. तथापि, याच्या मदतीने अगदी अचूक सर्च करणे शक्य नव्हते. नेमकी हीच बाब लक्षात घेत गुगलने आता टॉक टू बुक्स हे अतिशय अभिनव असे टुल एका वेबसाईटच्या माध्यमातून सादर केले आहे. याबाबत गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून आपली सविस्तर भूमिकादेखील मांडली आहे.

टॉक टू बुक्स या प्रणालीसाठी गुगलने आर्टीफिशियल इंटिलेजियन्स अर्थात कृत्रीम बुध्दीमत्ता आणि मशिन लर्नींग या प्रणालींचा उपयोग केला आहे. गुगल सर्चवर आपण पुस्तक वा त्या लेखकाचे नाव तसेच संबंधीत विषयाला सर्च करून आपल्याला हवी ती माहिती मिळवू शकतो. मात्र टॉक टू बुक्स या संकेतस्थळावर आपण कोणतेही वाक्य अथवा परिच्छेदाशी संबंधीत पुस्तकाची समग्र माहिती एका क्लिकवर मिळवू शकतो. गुगल बुकवर लिस्टींग करण्यात आलेल्या पुस्तकांमधील प्रत्येक शब्द स्कॅन करून हा सर्च रिझल्ट मिळत असतो हे विशेष. याशिवाय कुणीही सर्च बॉक्समध्ये आपल्याला हवा असणारा प्रश्‍न टाईप करून याचे उत्तर संबंधीत पुस्तकांमधून मिळवू शकतो. गुगल सर्चवर जगभरातील कोट्यवधी वेबसाईटची लिस्टींग असून याच्या माध्यमातून युजरला हव्या असणार्‍या बाबीचा शोध घेण्याची सुविधा आजवर देण्यात आली आहे. मात्र याच्या पुढे जात थेट ग्रंथ भांडारातून सर्च करण्याची सुविधा या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहे. अर्थात गुगल हे सर्च इंजिन माहितीच्या पलीकडे जात ज्ञानाकडे वळत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. यामुळे अर्थातच हे टुल अतिशय क्रांतीकारक ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

टॉक टू बुक्स हे संकेतस्थळ अद्याप प्राथमिक अवस्थेत असले तरी अतिशय कार्यक्षम असे आहे. भविष्यात याला अजून नाविन्यपूर्ण सुविधांची जोड मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आज तरी फक्त इंग्रजी भाषांमधील पुस्तकांसाठीच ही सुविधा असली तरी लवकरच यात मराठी, हिंदीतील भाषांचाही समावेश होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here