नवीन पेट्रोल इंजिनयुक्त हुंदाई वेर्ना दाखल

0

हुंदाई कंपनीने आपल्या वेर्ना या मॉडेलला आता १.४ लीटर क्षमतेच्या नवीन पेट्रोल इंजिनाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली असून यात उत्तम मायलेज मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

हुंदाई कंपनीने अलीकडेच आपल्या वेर्ना या लोकप्रिय मॉडेलची पाचव्या पिढीतली नवीन आवृत्ती सादर केली होती. यातील ई आणि ईएक्स या बेस व्हेरियंटमध्ये आता १.४ लीटर पेट्रोल इंजिनाचा पर्याय देण्यात आला आहे. आधी या व्हेरियंटमध्ये १.६ लीटर गॅमा पेट्रोल तर १.६ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल या प्रकारातील इंजिनचे पर्याय दिलेले होते. यात मॅन्युअल आणि अ‍ॅटोमॅटीक गिअर्सची सुविधा आहे. आता याच व्हेरियंटमध्ये वर नमूद केल्यानुसार १.४ लीटर क्षमतेचे कप्पा ड्युअल व्हीटीव्हीटी पेट्रोल इंजिन देण्यात आले असून याला ६ स्पीड मॅन्युअल गिअर्सची जोड देण्यात आली आहे. याचे एक्स-शोरूम मूल्य ७.८ लाखांपासून सुरू होणारे असेल.

हुंदाई वेर्नाच्या या नवीन व्हेरियंटमधील इंजिन हे परफॉर्मन्स आणि मायलेज या दोन्ही प्रकारांमध्ये अतिशय उत्तम आहे. यामुळे १९.१ किलोमीटर प्रति-लिटर इतके मायलेज मिळत असून ते आधीच्या इंजिनापेक्षा ८ टक्के अधिक असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातील उर्वरित फिचर्स हे नवीन वेर्ना या मॉडेलनुसारत असतील. अर्थात यात नवीन ग्रील असून यातील हेडलँप हे प्रोजेक्टर या प्रकारातील आहेत. यामध्ये एलईडी डे-टाईम रनिंग लँप, एलईडी टेल लँप आणि फॉग लँप देण्यात आले आहेत. यामध्ये सात इंच आकारमानाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देण्यात आली आहे. यात अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो या दोन्ही प्रणालींचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय अ‍ॅटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, स्टार्ट-स्टॉप सिस्टीम, रिअर पार्कींग सेन्सर आदी फिचर्सही असतील. यात सुरक्षेसाठी एयरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here