थ्री-डी मॉडेलिंगसाठी गुगलचे अ‍ॅप

0

गुगलने खास त्रिमीतीय म्हणजेच थ्री-डी मॉडेलिंगसाठी ब्लॉक्स हे अ‍ॅप सादर केले असून एआर आणि व्हिआर या दोन्ही प्रकारांमध्ये याचा उपयोग होणार आहे.

गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे ब्लॉक्सबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यात हे अ‍ॅप एचटीसी व्हाईव्ह आणि ऑक्युलस रिफ्ट या हेडसेटसाठी विशेष करून विकसित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान बहुतांश सॉफ्टवेअरमध्ये द्विमीतीय (टु-डी) डिस्प्लेवर त्रिमीतीय (थ्री-डी) मॉडेलिंग करावे लागते. यात अनेक त्रुटी राहत असतात. या पार्श्‍वभूमिवर एआर अर्थात ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी (विस्तारीत सत्यता) व व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (आभासी सत्यता) या दोन्ही प्रकारांमध्ये अतिशय सुलभ पध्दतीने विविध पॅटर्नचे मॉडेल्स तयार करण्यासाठी ब्लॉक्स उपयुक्त ठरणार आहे.

मॉडेलिंगची अगदी प्राथमिक माहिती नसणार्‍यांनाही याचा उपयोग होणार असल्याचे या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. अगदी मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या ब्लॉक्सच्या खेळण्याप्रमाणे कुणीही याला सहजपणे वापरू शकतो. याच्या मदतीने विविध आकारांच्या प्राथमिक मॉडेल्ससह विविध गुंतागुंतीचे मॉडेल्स तयार करणे शक्य आहे. गुगलने आधी टिल्ट ब्रश या टुलच्या मदतीने व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये कलाकुसरीचे काम करण्याची सुविधा प्रदान केली होती. या पाठोपाठ आता ब्लॉक्स सादर करण्यात आले आहे. हे अ‍ॅप ऑक्युलस स्टोअर आणि स्टेमवरून मोफत डाऊनलोड करून वापरता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here