थॉमसनचे किफायतशीर स्मार्ट टिव्ही

0

थॉमसन कंपनीने भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करतांना तीन किफायतशीर दरातले स्मार्ट टिव्ही सादर करण्याची घोषणा केली आहे.

कधी काळी भारतीय बाजारपेठेत होम अप्लायन्सेसमध्ये बर्‍यापैकी पकड असणार्‍या थॉमसन कंपनीने मध्यंतरी आपला गाशा गुंडाळला होता. काही दिवसांपूर्वीच ही कंपनी भारतात पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. या अनुषंगाने आता थॉमसनने तीन स्मार्ट टिव्हींच्या माध्यमातून भारतात पुनश्‍च प्रवेश केला आहे. थॉमसनने ४३ इंची अल्ट्रा एचडी फोर-के, ४० आणि ३२ इंची असे तीन मॉडेल्स सादर केले असून यांचे मूल्य अनुक्रमे २७,९९९; १९,९९० आणि १३,४९० रूपये आहे. या तिन्ही स्मार्ट टिव्हींमध्ये एआरएम कोर्ट्रेक्स सीए५३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके असेल.

थॉमसनच्या ४३ इंची मॉडेलमध्ये इतक्याच आकारमानाचा आणि ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा एलजी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइडच्या किटकॅट या प्रणालीवर चालणारा असून यावर जीमेल, फेसबुक, युट्युब, नेटफ्लिक्स आदी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. तर ४० आणि ३२ इंची मॉडेल्समध्ये अनुक्रमे फुल एचडी आणि एचडी रेडी म्हणजेच अनुक्रमे १९२० बाय १०८० आणि १३६६ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले देण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्ट टिव्ही मात्र अँड्रॉइडच्या ५.१.१ या आवृत्तीवर चालणारे आहेत. हे तिन्ही स्मार्ट टिव्ही युएसबी, एचडीएमआय, लॅन, वाय-फाय, एसडी कार्ड रीडर आदी फिचर्सने सज्ज आहेत. तर यामध्ये १० वॅट क्षमतेचे दोन स्पीकर दिलेले आहेत. थॉमसन कंपनीचे हे तिन्ही स्मार्ट टिव्ही ग्राहकांना फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here