तीन पॉप-अप कॅमेरे, ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन

0
तीन पॉप-अप कॅमेर्‍यांनी युक्त ओप्पो फाईंड एक्स, oppo find x

ओप्पो कंपनीने तीन पॉप-अप या प्रकारातील कॅमेर्‍यांनी युक्त असणारा ओप्पो फाईंड एक्स हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. याची रॅम ८ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज तब्बल २५६ जीबी इतके आहे.

ओप्पो कंपनीने गत महिन्यातच आपल्या फाइंड एक्स या मॉडेलचे अनावरण केले होते. आज हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आला. हे मॉडेल ग्राहकांना ५९,९९९ रूपये मूल्यात फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यामध्ये देण्यात आलेले तिन्ही कॅमेरे हे पॉप-अप या प्रकारातील आहेत. यातील दोन कॅमेरे हे रिअर तर एक कॅमेरा फ्रंट या प्रकारातील असेल. स्मार्टफोन ऑफ असतांना तसेच कॅमेरा अ‍ॅप बंद असतांना हे कॅमेरा आता दडलेले असतात. तथापि, स्मार्टफोन सुरू असल्यावर संबंधीत युजरने कॅमेरा अ‍ॅप सुरू करताच हे तिन्ही कॅमेरे सक्रीय होतात. यामुळे युजर हव्या त्या कॅमेर्‍याचा वापर करू शकतो. यातील मागच्या बाजूस २० आणि १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्याच मदतीने या मॉडेलमध्ये थ्री-डी फेसियल स्कॅनची सुविधा यात दिलेली आहे. कॅमेरा अ‍ॅप बंद करताच यातील तिन्ही कॅमेरे स्मार्टफोनच्या बॉडीमध्ये लपविले जातात. याचा सर्वात मोठा परिणाम हा डिस्प्लेवर दिसून आला आहे.

ओप्पो फाइंड एक्स या मॉडेलमध्ये अगदी वरील बाजूस नॉचदेखील नसून अगदी खरा फुल-व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल व्ह्यू या प्रकारातील, १९:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा, ६.४ इंच आकारमानाचा, फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आणि ओएलईडी या प्रकारातील असेल. याचे स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर तब्बल ९३.८ टक्के इतके असणार आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे.

ओप्पो फाइंड एक्स हा स्मार्टफोन क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरने सज्ज आहे. याची रॅम ८ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज तब्बल २५६ जीबी असणार आहे. यातील बॅटरी ३७३० मिलीअँपिअर क्षमतेची असून यामध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट असेल. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर आधारित कलर ओएसवर चालणारा असेल. पहिल्यांदा हा स्मार्टफोन चीनी बाजारपेठेत सादर करण्यात आला होता. आज याला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली.

पहा :- ओप्पो फाईंड एक्स मॉडेलची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here