ट्विटरवर डाटा सेव्हर फिचर : जाणून घ्या सर्व फायद्यांसह वापरण्याची पध्दत !

0
twitter app, ट्विटर

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी डाटा सेव्हर फिचर दिले असून याच्या मदतीने कुणीही या मायक्रो-ब्लॉगींग सेवेला वापरतांना डाटाची बचत करू शकणार आहे.

डाटा सेव्हर या प्रकारचे फिचर ट्विटरने आधीच विंडोज प्रणालीच्या अ‍ॅपसाठी दिलेले होते. तर यानंतर अलीकडेच या अ‍ॅपची लाईट आवृत्तीदेखील सादर करण्यात आली आहे. या अनुषंगाने आता अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सला हे फिचर वापरता येणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार या फिचरच्या मदतीने कुणीही आपला डाटा वाचवू शकणार आहे. खरं तर जगभरात इंटरनेटचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. भारताचा विचार केला असता, देशाच्या कान्याकोपर्‍यात आधीच फोर-जी नेटवर्क कार्यान्वित झालेले आहे. तथापि, असे असले तरी अनेकदा इंटरनेटचा वेग आणि अर्थातच मर्यादीत डाटा पॅक या बाबी अडसर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बहुतांश कंपन्यांनी आपापल्या सेवांना लाईट अ‍ॅपच्या माध्यमातून सादर केले आहे. फेसबुक, ट्विटर, स्काईप आदींसह अन्य सेवांसाठी लाईट अ‍ॅप आधीच कार्यरत झालेले आहेत. अर्थात ट्विटरचे लाईट अ‍ॅप हे स्वतंत्र आहे. म्हणजे याचा वापर करण्यासाठी याला इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे. तथापि, ट्विटरच्या मुख्य अ‍ॅपवरच डाटा सेव्हर हे फिचर काम करणार असल्यामुळे युजर्सला डाटा बचतीचा लाभ मिळणार आहे.

यापुढे कुणीही ट्विटर युजर आपल्या सेटींगमध्ये जाऊन डाटा सेव्हर हे फिचर कार्यान्वित करू शकणार आहे. हे ऑन केल्यामुळे संबंधीत युजरला त्याच्या न्यूजफिडमध्ये ऑटो-प्ले व्हिडीओ दिसणार नाहीत. (सध्यादेखील सेटींगमध्ये जाऊन कुणीही याला ऑफ करू शकतो.) याशिवाय युजरला उच्च ग्राफीक्सयुक्त प्रतिमा दिसणार नाहीत. तर कुणाला या प्रतिमा उच्च क्षमतेत पहावयाच्या असल्यास त्याला यावर क्लिक करून मूळ इमेज पाहण्याची सुविधा यात देण्यात आलेली आहे. यामुळे अर्थातच युजरचा डाटा वाचणार आहे. जगभरातील अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी हे फिचर अपडेटच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे ट्विटरने जाहीर केले आहे.

डाटा सेव्हरचा उपयोग कसा कराल ?

या फिचरचा उपयोग करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्सचा वापर करावा लागणार आहे. युजरला आपल्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करून मेन्यूमध्ये जाऊन सेटींग्ज अँड प्रायव्हसी यावर क्लिक करावे लागेल. यानंतर डाटा युजेसवर क्लिक केल्यावर विविध पर्याय दिसतील. यात सर्वात वर डाटा सेव्हरचा पर्याय दिसेल. याला सिलेक्ट केल्यानंतर हे फिचर कार्यान्वित होणार आहे. खालील प्रतिमेत याचा स्क्रीनशॉट दिलेला आहे.

( सध्या जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने हे फिचर देण्यात येत आहे. यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये ट्विटरची अद्ययावत आवृत्ती असणे आवश्यक आहे. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here