ट्विटरवरील लाईक बटन होणार इतिहासजमा ?

0

ट्विटरवरील लाईक बटन हे लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले असून याच्या जागी युजर्सच्या सहभागासाठीचे एखादे नवीन फिचर येण्याची शक्यता आहे.

ट्विटरवर लाईक या बटनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच्या माध्यमातून कुणीही युजर हा त्याच्या स्वत:च्या तसेच अन्य अकाऊंटवरील कोणत्याही ट्विटला पसंती देऊ शकतो. याला हृदयाच्या आकाराने दर्शविण्यात येते. साधारणपणे तीन वर्षांपासून ट्विटरने लाईक करण्याची सुविधा दिली असून याला युजर्सची चांगलीच पसंती मिळालेली आहे. २०१५ मध्ये फेव्हरिटस् या बटनाऐवजी लाईक करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली होती. तेव्हापासून ट्विटरच्या अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या सर्व आवृत्त्यांसाठी याचा वापर होत आहे. मात्र लवकरच हेच लाईक बटन इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्से यांनी आधीच लाईकला नापसंती दिलेली आहे. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे याबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या मते लाईकऐवजी युजर्सच्या एंगेजमेंटसाठी एखादे नवीन टुल उपयुक्त ठरू शकते. यामुळे लवकरच लाईकची गच्छंती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर ट्विटरने अधिकृतपणे लाईकला तातडीने हटविण्यात येणार नसले तरी यावर विचार सुरू असल्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून संबंधीत चर्चेला एका प्रकारे दुजोराच देण्यात आलेला आहे. असे झाल्यात कोणत्याही ट्विटला रिट्वीट, कॉमेंट आणि मॅसेज करणे हेच पर्याय उरणार आहेत.

लाईक बटनाऐवजी ट्विटरवर नेमके काय येणार? याबाबत आता औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. फेसबुकने आधीच युजर्सच्या वाढीव एंगेजमेंटसाठी रिअ‍ॅक्शन्सची सुविधा दिलेली आहे. यातून विविध भावाविष्कारांची अभिव्यक्ती करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यात लाईकसह एकूण सहा प्रकारे युजर आपले भाव व्यक्त करू शकतो. यामुळे ट्विटरवरही याच प्रकारे वाढीव भावाविष्कारयुक्त प्रतिसादाची सुविधा देण्यात येईल अशी शक्यता आहे. याबाबत येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here