ट्विटरतर्फे पेड सेवेस प्रारंभ

0
twitter1

ट्विटरने आता ९९ डॉलर्स प्रति-महिना आकारणी करून प्रमोटेड ट्विटस् देण्याची नवीन प्रणाली विकसित केली असून याला बीटा स्वरूपात प्रारंभ केला आहे.

ट्विटरला नवीन युजर्स मिळत नसून या मायक्रो-ब्लॉगींग साईटच्या उत्पन्नातही कमालीची घट झाली आहे. वास्तविक पाहता ट्विटरवर आधीपासूनच जाहिरातींची तरतूद असली तरी यात फारशी वाढ झालेली नाही. आकड्यांचाच विचार करता २०१७च्या दुसर्‍या तिमाहित ट्विटरने ४३.९ कोटी डॉलर्सची कमाई केली. गेल्या वर्षी याच कालखंडात हा आकडा ५३.५ कोटी डॉलर्स इतका होता. या पार्श्‍वभूमिवर ट्विटरतर्फे उत्पन्नाच्या नवीन मार्गांचा शोध घेतला जात असून यातूनच पेड सेवा सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत ९९ डॉलर्स प्रति महिना भरून कुणीही आपले ट्विट प्रमोट करू शकतात. याच्या अंतर्गत ही पेड सेवा घेणार्‍याचे ट्विट हे त्याला फॉलो न करणार्‍यांच्याही न्यूज फिडवर दिसू शकतात. या माध्यमातून संबंधीत युजर्सला नवीन फॉलोअर्स मिळू शकतील असे ट्विटरतर्फे सांगण्यात येत आहे. सध्या तरी ही सेवा मर्यादीत युजर्ससाठी सुरू करण्यात आली असून येत्या कालखंडात मात्र ती सर्व युजर्ससाठी खुली होण्याची शक्यता आहे.

सध्या सोशल मीडियावर खर्च करणार्‍यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. फेसबुकला प्रमोटेड पोस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. नेमके याच पध्दतीने ट्विटरनेही प्रमोटेड ट्विटस्चा मार्ग पत्करला आहे. तथापि, फेसबुकच्या प्रमोटेड पोस्ट या अत्यंत लवचीक असून याची पेमेंट प्रणालीदेखील याच पध्दतीची आहे. यामुळे अगदी काही रूपयांपासून पोस्ट प्रमोट करण्याची सोय फेसबुकवर आहे. यातच फेसबुकवरील प्रमोटेड पोस्ट हव्या टार्गेट ग्रुपपर्यंत पोहचवण्याची सुविधा आहे. ट्विटरने याऐवजी सरळ ९९ डॉलर्स (जी निश्‍चितच जास्त रक्कम आहे.) आकारणी केली असून यात अद्याप तरी टार्गेट युजर्सची सुविधा देण्यात आलेली नाही. यामुळे ही पेड सेवा यशस्वी होईल का? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अद्याप प्रारंभी ही सेवा बीटा अवस्थेत सुरू करण्यात आली आहे. इच्छुक युजर्सला या लिंकवर क्लिक करून संबंधीत सेवा घेता येईल. विशेष म्हणजे एक महिन्यापर्यंत ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे या पेजवर नमूद करण्यात आले आहे. यानंतर मात्र आकारणी करण्यात येणार आहे. ही पेड सेवा कितपत परिणामकारक ठरतेय? हे कुणालाही येथे क्लिक करून आपल्या अ‍ॅनालिटीक्स विभागात पाहता येईल. ट्विटरवरील संबंधीत पेड सेवा ही प्रमोटेड पोस्टच्या स्वरूपात सादर करण्यात येणार असून विद्यमान जाहिरातीच्या प्रणालीपेक्षा ती भिन्न असेल ही बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here