झेडटीईचा ड्युअल डिस्प्ले असणारा स्मार्टफोन !

0

झेडटीई कंपनीने आता चक्क ड्युअल डिस्प्ले असणारा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या ड्युअल कॅमेर्‍यांनी युक्त असणारे स्मार्टफोन्स प्रचलीत झाले आहेत. यामुळे या फिचरबाबत कुणाला नाविन्य वाटत नाहीय. तथापि, आता झेडटीई या कंपनीने चक्क दोन डिस्प्ले असणारा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुबिया एक्स हे या मॉडेलचे नाव असून नुकतेच याचे अनावरण करण्यात आले आहे. यातील मुख्य डिस्प्ले हा ६.२६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा आहे. तर याच्या मागील बाजूस ५.१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही म्हणजे पुढील आणि मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. यामुळे कुणीही हव्या त्या बाजूने स्मार्टफोन अनलॉक करू शकतो. याच्या मागील बाजूस १६ आणि २४ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यामुळे हे कॅमेरे मुख्य आणि फ्रंट या दोन्ही प्रकारात काम करू शकतील. अर्थात यात प्रतिमांसोबत सेल्फीदेखील घेता येणार आहे.

नुबिया एक्स या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६/८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४/२५६ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये मल्टी-लेअर ग्राफेन कुलींग सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे हा स्मार्टफोन दीर्घ काळापर्यंत वापरला तरीही तो गरम होत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फास्ट चार्जींगच्या सुविधेने सज्ज असणारी ३,८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा युएक्स ६.० एक्स हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये सादर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here