जागतिक बाजारपेठेत टॅबलेटच्या विक्रीत घट सुरूच

0
टॅबलेट अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट व सॅमसंगमध्ये तीव्र चुरस, tablet

जागतिक बाजारपेठेत टॅबलेटच्या विक्रीत घट सुरू असून हा ट्रेंड आगामी काळात कायम राहणार असल्याचे आयडीसी या रिचर्स फर्मच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

जगभरात स्मार्टफोनची लोकप्रियता अबाधित असल्याचा फटका अन्य संगणकीय उपकरणांना बसला आहे. घरगुती वापराचे संगणक अर्थात पीसीच्या विक्रीत आधीच लक्षणीय घट झालेली आहे. याच्या सोबत टॅबलेटच्या विक्रीतदेखील हाच प्रकार सुरू झाल्याचे दिसून येत आहे. खरं तर, २०१६ पासूनच टॅबलेटची विक्री हळूहळू कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गत तिमाहीचे आकडे पाहिले असता, याचे गांभिर्य अधोरेखीत होऊ लागले आहे. या संदर्भात आयडीसी म्हणजेच इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन या ख्यातप्राप्त रिसर्च फर्मने या वर्षातील तिसरी तिमाही अर्थात जुलै ते सप्टेंबर-२०१८ या कालखंडातील टॅबलेट विक्रीच्या आकडेवारीवरून तयार केलेला अहवाल अतिशय उद्बोधक असाच आहे. यात टॅबलेटच्या घटत्या लोकप्रियतेचे प्रतिबिंब उमटले आहे.

या अहवालानुसार जगभरात गत तिमाहीत ३.६४ लाख टॅबलेट विकले गेलेत. गेल्या वर्षातील याच कालखंडात विकल्या गेलेल्या टॅबलेटच्या तुलनेत हा आकडा तब्बल ८.६ टक्क्यांनी कमी आहे. यात स्लेट टॅबलेटने आपली लोकप्रियता बर्‍यापैकी कायम ठेवली असली तरी याच्या विक्रीत ७.९ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. डिटॅचेबल अर्थात टु-इन-वन या प्रकारातील टॅबलेटच्या विक्रीत तर तब्बल १३.१ टक्क्यांची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटीचा सर्वच उत्पादकांना फटका बसला आहे. अ‍ॅपलने या क्षेत्रातील आपले पहिले स्थान अबाधित राखले आहे. या पाठोपाठ सॅमसंग आणि अमेझॉनने टॅबलेटच्या क्षेत्रातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र या सर्व कंपन्यांच्या विक्रीतदेखील घट झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, स्मार्टफोनच्या लोकप्रियतेचा वाढता आलेख नजीकच्या भविष्यकाळात कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे टॅबलेटच्या विक्रीचा हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here