चीनमध्ये फेसबुक मागच्या दाराने दाखल

0

चीनमध्ये फेसबुक कंपनीने कलरफुल बलून्स हे अ‍ॅप कोणताही गाजावाजा न करता आणि आपली ओळख न दर्शविता लाँच केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

चीनमध्ये आयटी कंपन्यांवर कडक निर्बंध आहेत. यामुळे फेसबुक या सोशल साईटवर तेथे २००९ पासून बंदी आहे. तर अलीकडेच याच कंपनीची मालकी असणार्‍या व्हाटसअ‍ॅपवरही बर्‍याच मर्यादा लादण्यात आल्या आहेत. फेसबुक कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने चीनमध्ये प्रवेशासाठी जंग-जंग पछाडले तरी तेथील सरकारने आपला पवित्रा बदललेला नाही. खरं तर झुकरबर्गची पत्नी ही मूळची चीनी आहे. यातच त्याने चीनी भाषा शिकून त्यात व्याख्यानदेखील देत चीन जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, चीनी सरकार आपली ताठर भूमिका सोडण्यास तयार नाही. या सर्व गदारोळात फेसबुक कंपनीने चीनमध्ये कलरफुल बलून्स हे अ‍ॅप सादर केले आहे. अर्थात यात नवल ते काय ? असे कुणीही विचारू शकेल. तथापि, कोणताही गाजावाजा न करता आणि याची मालकी फेसबुककडे असल्याचा कोणताही सुगावा लागू न देता हे अ‍ॅप चीनी जनतेला सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप फेसबुकच्याच जगभरात उपलब्ध असणार्‍या मोमेंटस् या अ‍ॅप्लीकेशनची हुबेहूब कॉपी असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात फेसबुक कंपनीतल्या या प्रोजेक्टशी संबंधीत असणार्‍याच्या हवाल्याने न्यूयॉर्क टाईम्सने सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. वास्तविक पाहता फेसबुक कंपनीने ओळख लपवली तरी याचू मूल मालकी चीन सरकारला समजणे फारसे कठीण नाही. यामुळे चीनी सरकाशी समझोता करून तर फेसबुकने हे पाऊल उचलले नाही ना ? अशी शक्यतादेखील व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here