गुगल होम हब : भन्नाट फिचर्सयुक्त स्मार्ट डिस्प्ले

0
गुगल होम हब, google home hub

गुगलने होम हब या नावाने स्मार्ट डिस्प्ले बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यामध्ये अतिशय उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

विविध टेक कंपन्यांमधील लढाईचे पुढील मैदान हा स्मार्ट स्पीकर व डिस्प्ले असतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. फेसबुकने पोर्टल आणि पोर्टल प्लस ही उपकरणे सादर करून एक दिवस उलटत नाही तोच गुगलनेही स्मार्ट डिस्प्ले सादर करून या क्षेत्रात उडी घेतली आहे. गुगलने आधीच होम या मालिकेत काही स्मार्ट स्पीकर्स सादर केले आहेत. यातील बहुतांश फिचर्स कायम ठेवत होम हब हे उपकरण सादर करण्यात आले आहे. यातील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे यामध्ये ७ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यावर असणार्‍या डॅशबोर्डच्या माध्यमातून युजर आपल्या घरातील विविध स्मार्ट उपकरणांना एकाच ठिकाणावरून संचलीत करू शकतो. यात स्मार्ट लाईट, ब्रॉडकास्ट, मिडीया, थमोर्टस्टॅट, लॉक आणि कॅमेरा आदींचा समावेश आहे. याचा वापर करून कुणीही घरातील स्मार्ट लाईट तसेच अन्य उपकरणांचा वापर करू शकतो. एका अर्थाने हे स्मार्ट होम कंट्रोलर या प्रकारातील उपकरण आहे.

यावरून कोणतेही अन्य फंक्शन सुरू नसतांना हे उपकरण लाईव्ह फोटो फ्रेम म्हणून सुरू राहते. यात युजर आपल्याला हव्या असणार्‍या प्रतिमांना सिलेक्ट करू शकतो. यावरून युजरला लक्षावधी ऑनलाईन रेसिपीजमधून हव्या त्या रेसिपीला पाहता येणार आहे. यावर युट्युब, गुगल सर्च, गुगल मॅप्स, कॅलेंडर आदी महत्वाच्या सेवांचा सपोर्टदेखील देण्यात आलेला आहे. यासाठी युजरला टचस्क्रीन डिस्प्लेचा प्रत्यक्ष वापर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कारण यामध्ये गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेला आहे. परिणामी व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. यात गुगलने व्हॉइस मॅच हे फिचर दिलेले आहे. यामुळे याचा एकाच वेळी अनेक युजर्स वापर करू शकतील. यामध्ये अँबिअंट लाईट सेन्सर दिलेले असून यामुळे भोवतालच्या प्रकाशाशी हे उपकरण आपोआप अ‍ॅडजस्ट होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यासोबत गुगलने युट्युबची प्रिमीयम सेवा सहा महिन्यांपर्यंत मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे होम हब या उपकरणात कॅमेरा देण्यात आलेला नाहीय. परिणामी याच्या मदतीने कुणीही व्हिडीओ कॉल करू शकणार नाही. येथेच अमेझॉनचा इको शो आणि फेसबुकच्या पोर्टल या उपकरणांपासून हे डिव्हाईस थोडे वेगळे आहे. हे उपकरण पिंक, डार्क ग्रे आणि ग्रीन या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये १४९ डॉलर्स (सुमारे ११ हजार रूपये) इतक्या मूल्यात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच याला भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

पहा : गुगल होम हबची प्राथमिक माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here