गुगल पिक्सेल ३, पिक्सेल ३ एक्सएल स्मार्टफोन्सची घोषणा

0
गुगल पिक्सेल ३, पिक्सेल ३ एक्सएल,google-pixel-3-pixel-3-xl

गुगलने गत अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून असणार्‍या पिक्सेल ३ आणि पिक्सेल ३ एक्सएल या स्मार्टफोन्सची घोषणा केली असून याचे आज अनावरण करण्यात आले.

गुगलने आज न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध उपकरणांना सादर केले. यातील सर्वात लक्षवेधी अर्थातच पिक्सेल मालिकेतील दोन स्मार्टफोन्स ठरले. गुगलने गत वर्षी पिक्सेल २ आणि पिक्सेल २ एक्सएल हे मॉडेल लाँच केले होते. या वर्षी याच दोन्ही मॉडेल्सची पुढची आवृत्ती पिक्सेल ३ आणि पिक्सेल ३ एक्सएलच्या माध्यमातून सादर करण्यात आली. पिक्सेल ३ मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. तर पिक्सेल ३ एक्सएल या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस (२९६० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले आहे. याच्या वरील भागात नॉच देण्यात आला असून याचा अस्पेक्ट रेशो १८:५:९ असा आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली असून यावर संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४ जीबी व १२८ जीबींचा पर्याय देण्यात आला आहे.

गुगलच्या पिक्सेल मालिकेतील मॉडेल्समध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे असतात. हाच लौकीक कायम ठेवत पिक्सेल ३ आणि पिक्सेल ३ एक्सएल या दोन्ही मॉडेल्समध्ये दर्जेदार कॅमेरे दिलेले आहेत. याच्या समोरच्या बाजूस प्रत्येकी ८ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील एकात ७५ तर दुसर्‍या ९७ अंशाचा व्ह्यू अँगल देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने अतिशय उत्कृष्ट प्रतिच्या सेल्फी प्रतिमा घेता येणार असल्याचे गुगलने नमूद केले आहे. तर याच्या मागील बाजूस १२.२ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, ऑटो-फोकस आणि एफ/१.८ अपर्चरचा समावेश आहे. या कॅमेर्‍यांमध्ये काही अभिनव फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने टॉप शॉट हे फिचर महत्वपूर्ण मानले जात आहे. यात सुपर रेझ झूम प्रदान करण्यात आला आहे. नाईट सायच्या मदतीने कमी उजेडातही चांगल्या प्रतिमा घेता येणार आहेत. यामध्ये एआर स्टीकर्सचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फोटा बूथ मोडदेखील दिलेला आहे. यामुळे कॅमेरा सुरू असतांना हालचाल झाल्यानंतर प्रतिमा घेण्याची सुविधा दिलेली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स वॉटर आणि डस्टप्रूफ आहेत. यामुळे याचा रफ वापर करता येणार आहे. पिक्सेल ३ या मॉडेलमध्ये २९१५ तर पिक्सेल ३ एक्सएलमध्ये ३४३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. या दोन्ही मॉडेल्ससोबत पिक्सल स्टँड हे वायरलेस चार्जरदेखील प्रदान करण्यात आले आहे.

पिक्सेल ३ आणि पिक्सेल ३ एक्सएल हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या पाई या ताज्या आवृत्तीवर चालणारे आहेत. यात गुगल असिस्टंट, गुगल डे-ड्रीम, डे-ड्रीम व्हीआर आदींचा सपोर्टदेखील दिलेला आहे. तर यामध्ये फोर-जी व्हिओएलईटीसह एनएफसी, वाय-फाय, गुगल-कास्ट, जीपीएस आदी कनेक्टीव्हिटीचे पर्याय दिलेले आहेत. या दोन्ही मॉडेल्सचे भारतातील मूल्यदेखील आजच जाहीर करण्यात आले आहेत. भारतात हे स्मार्टफोन्स १ नोव्हेंबरपासून मिळणार आहेत. पिक्सेल ३ या मॉडेलची ६४ जीबी स्टोअरेजची आवृत्ती ७१,००० तर १२८ जीबी आवृत्ती ८०,००० रूपयात मिळणार आहे. पिक्सेल ३ एक्सएल या मॉडेलची ६४ जीबी आवृत्ती ८३,००० तर १२८ जीबी आवृत्ती ९२,००० रूपयात मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here