गुगल पिक्सलबुक लॅपटॉपची घोषणा

0

गुगलने अतिशय दर्जेदार फिचर्सने सज्ज असणारा पिक्सलबुक हा लॅपटॉप जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

गुगल पिक्सलबुक हा लॅपटॉप गुगलच्याच क्रोम या ऑपरेटींग प्रणालीवर चालणार आहे. हे मॉडेल लॅपटॉपसोबत टॅबलेट म्हणूनदेखील वापरणे शक्य आहे. एकंदरीत ते टॅबलेट, स्टँट, टेंट आणि लॅपटॉप या चार प्रकारात वापरता येणार आहे. यात १२.३ इंच आकारमानाचा आणि २४०० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा ३६० अंशात फिरणारा टचस्क्रीन एलसीडी डिस्प्ले आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये १६ जीबीपर्यंत रॅम तर ५१२ जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोअरेज असेल. यात इंटेलचा सातव्या पिढीतला कोअर आय-५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ब्लॅकलिट कि-बोर्ड देण्यात आला आहे. यात ४१ वॅट क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तासांपर्यंत चालू शकते. यामध्ये एचडी क्षमतेचा कॅमेरादेखील देण्यात आला आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या लॅपटॉपमध्ये गुगल असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी या मॉडेलमध्ये स्वतंत्र की देण्यात आली आहे. याशिवाय कुणीही ओके गुगल म्हणून ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्स कार्यान्वित करू शकतो.

गुगल पिक्सलबुक हा लॅपटॉप गुगल कंपनीच्या क्रोम या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा असला तरी यात अँड्रॉइडचे अ‍ॅप्स वापरता येतील. दरम्यान, या मॉडेल सोबत ९९ डॉलर्स मूल्य असणारा पिक्सलबुक पेनदेखील सादर करण्यात आला आहे. याच्या मदतीने रेखाटन करण्यासह नोटस्देखील घेता येणार आहेत. गुगल पिक्सलबुकच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ९९९ ते १६९९ डॉलर्सच्या दरम्यान असेल. भारतात लवकरच हा लॅपटॉप लाँच होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here