गुगल असिस्टंट असणारा स्मार्ट डिस्प्ले दाखल

0
गुगल असिस्टंट असणारा स्मार्ट डिस्प्ले

लेनोव्होने आता गुगल असिस्टंट असणारा स्मार्ट डिस्प्ले बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात ध्वनी आज्ञावलीवर विविध फंक्शन्स पार पाडता येणार आहेत.

जगभरातील बर्‍याचशा स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंट देण्यात आला असून याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. याला विविध स्मार्ट उपकरणांमध्येही वापरले जात आहे. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे स्मार्ट स्पीकर होय. आता याच गुगल असिस्टंटला स्मार्ट डिस्प्लेमध्ये वापरण्यात येणार आहे. लेनोव्हो कंपनीने या प्रकारातील स्मार्ट डिस्प्ले बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. एका अर्थाने हे डिस्प्लेयुक्त गुगल होम उपकरण असणार आहे. यामध्ये गुगल होमप्रमाणेच ‘ओके गुगल’ या व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा वापर करून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. यात कुणीही आपल्याला हव्या असणार्‍या बातम्या, गाणी, हवामानाचे अलर्ट, विविध रेसीपीज आदींची माहिती ऐकू/पाहू शकणार आहे. यामध्ये युट्युब, स्पॉटीफाय, एचबीओ नाऊ आदी सेवा इनबिल्ट अवस्थेत देण्यात येणार आहेत. तर हा स्मार्ट डिस्प्ले घेणार्‍या ग्राहकाला युट्युबची प्रिमीयम मेंबरशीप तीन महिन्यांसाठी मोफत देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे गुगल ड्युओ अ‍ॅपचा वापर करून कुणीही व्हिडीओ कॉलींग करू शकणार आहे.

लेनोव्होच्या या उपकरणात ८ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६२४ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी इतके असणार आहे. ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायच्या माध्यमातून याला स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. यामध्ये १० वॅट क्षमतेचा स्पीकर दिलेला आहे. हा स्मार्ट डिस्प्ले अमेझॉनच्या इको शो या उपकरणाला तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतील याचे मूल्य १९९ डॉलर्स असून हे मॉडेल लवकरच भारतात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here