इंटरनेटचे व्यसन सोडविणारा स्मार्टफोन

0

सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी जे२ प्रो हा स्मार्टफोन नवीन स्वरूपात सादर केला असून यात इंटरनेटचे व्यसन सोडविण्यासाठी एक अफलातून व्यवस्था करण्यात आली आहे.

स्मार्टफोन म्हटला की, इंटरनेट आलेच. जगभरात आता स्मार्टफोन या लहानशा उपकरणावरून इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात केला जात आहे. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासाठी इंटरनेट आवश्यक असले तरी याचा वापर किती मर्यादेत करावा याची सारासारविवेकबुध्दी सर्वांकडेच नसते. यामुळे जगभरातील अब्जावधी लोक दिवसातील बहुतांश वेळ इंटरनेटवर व्यतीत करत असतात. एका अर्थाने त्यांना इंटरनेटचे जणू व्यसनच जडले आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो या मॉडेलमध्ये इंटरनेट वापराची सुविधाच देण्यात आलेली नाही. यामध्ये टुजी/थ्रीजी वा फोरजी यापैकी कोणत्याही नेटवर्कचा सपोर्ट दिलेला नाही. यासोबत यात वाय-फाय वापरण्याची सुविधादेखील नाही. अर्थात इंटरनेटच्या वापरण्याची सुविधा नसणारा हा जगातील एकमेव स्मार्टफोन बनला आहे. या माध्यमातून इंटरनेटचे व्यसन सोडविण्यास मदत होणार असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे. तथापि, हा अपवाद वगळता यातील बहुतांश फिचर्स हे स्मार्टफोनचेच असल्याची बाब लक्षात घेण्याची गरज आहे. हा स्मार्टफोन विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरू शकतो असा दावा सॅमसंगने केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले आहे. याची रॅम १.५ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य १९० डॉलर्स (सुमारे १२,४०० रूपये) असून पहिल्यांदा हा स्मार्टफोन कोरियात सादर करण्यात आला आहे. भारतातही हा स्मार्टफोन लवकरच सादर होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here