आयमॅक झाले २० वर्षांचे !

0

अ‍ॅपल कंपनीच्या आयकॉनीक आयमॅक या संगणकाला लाँच करण्यास आता २० वर्षे झाली असून या कालखंडात या डेस्कटॉपने आपली लोकप्रियता अबाधित ठेवली आहे.

नव्वदच्या दशकाच्या मध्यावर अ‍ॅपल कंपनीची अतिशय वाईट अवस्था झाली होती. यातच कंपनीतून आधी हकालपट्टी करण्यात आलेल्या स्टीव्ह जॉब्ज यांना पुन्हा पाचारण करण्यात आले. त्यांनी काळाचा वेध घेत आयमॅक हा डेस्कटॉप संगणक ६ मे १९९८ रोजी लाँच केला. इंटरनेटच्या युगास प्रारंभ होत असल्याचे पाहून स्टीव्ह जॉब्ज यांनी आयमॅक या आपल्या मॉडेलची डिझाईन केली होती. अर्थात यामध्ये अतिशय सुलभ पध्दतीत इंटरनेट वापराची व्यवस्था प्रदान करण्यात आली होती. एका शानदार कार्यक्रमात स्टीव्ह जॉब्ज यांनी आयमॅक संगणकाचे अनावरण केले.

मूळ आयमॅक या मॉडेलमधील फिचर्स हे आजच्या तुलनेत अतिशय कमी दर्जाचे होते. यात १५ इंच आकारमानाचा व १०२४ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले होता. यात इनबिल्ट स्टिरीओ स्पीकर्स देण्यात आले होते. यात युएसबी आणि इथरनेट पोर्ट असून इंटरनेटसाठी इनबिल्ट मॉडेम देण्यात आला होता. यात पॉवरपीसी जी प्रोसेसर होता. याची रॅम ३२ मेगाबाईट असून ती १२८ मेगाबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा होती. तर यात ४ जीबी स्टोअरेज देण्यात आले होते. हे डेस्कटॉप संगणक मॅक ओएस ८.१ या प्रणालीवर चालणारे होते. आजच्या आयमॅक मॉडेल्समध्ये याच्या किती तरी पटीने सरस फिचर्स असतात. अर्थात त्या काळातही आयमॅक मॉडेल तुफान लोकप्रिय ठरले होते.

दरम्यान, आयमॅक या डेस्कटॉप संगणकाला दोन दशके पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून अ‍ॅपचे सीईओ टिम कुक यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यात स्टिव्ह जॉब्ज हे आयमॅक लाँच करतांना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here