आयपॉड जाणार काळाच्या पडद्याआड

0

अ‍ॅपलने आयपॉड शफल आणि आयपॉड नॅनो या मॉडेल्सची विक्री थांबविल्याने काही वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर राहिलेले आयपॉड उपकरण आता काळाच्या पडद्याआड जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

डिजीटल संगीताच्या इतिहासात आयपॉड या उपकरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. खरं तर सत्तरच्या दशकाच्या शेवटी सोनी कंपनीने बाजारपेठेत उतारलेल्या वॉकमनने घडविलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती आयपॉड या गॅजेटने केली आहे यात शंकाच नाही. अर्थात वॉकमनची सद्दी संपण्यास पाव शतक लागले तर आयपॉड अवघ्या सहा-सात वर्षात बाजूला फेकले गेले. २००१ साली आयपॉड हे उपकरण पहिल्यांदा सादर करण्यात आले. तेव्हा अडचणीत असणार्‍या अ‍ॅपलला आयपॉड आणि त्या पाठोपाठ आलेल्या आयपॅड आणि आयफोन या उपकरणांनी जीवदानच दिले नाही तर या कंपनीचे नशिब अक्षरश: फळफळले. तर शेवटचे आयपॉड मॉडेल १५ जुलै २०१५ रोजी लाँच करण्यात आले. या बाबींच्या पार्श्‍वभूमिवर अ‍ॅपलने आता आयपॅड शफल आणि आयपॅड नॅनो या कधीकाळी खूप लोकप्रिय असणार्‍या मॉडेल्सची विक्री थांबविण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही मॉडेल्सचे उत्पादन आधीच थांबविण्यात आले होते. आता विक्रीदेखील थांबवल्याने ही दोन्ही उपकरणे काळाच्या पडद्याआड जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तरी फक्त आयपॅड टच हे मॉडेलच विक्रीस उपलब्ध असले तरी तेदेखील आज ना उद्या बंद होणार असल्याचे संकेत आहेत.

इंटरनेटवरील पायरसीमुळे म्युझिक इंडस्ट्री त्रस्त झाली असतांना आणि सीडी/डीव्हीडी प्लेअर्सने कॅसेट प्लेअरची जागा घेतल्यानंतर आयपॅड हे उपकरण उदयास आले. अगदी हातात मावणार्‍या या उपकरणात शेकडो गाण्यांचा आणि तोदेखील डिजीटल संग्रह होत असल्यामुळे याला लोकप्रियता मिळाली. तथापि, २००७ साली आयफोनचे आणि त्यानंतर अर्थातच स्मार्टफोनचे युग सुरू झाले. यामुळे स्वतंत्र म्युझिक प्लेअरऐवजी स्मार्टफोनमध्येच संगीत ऐकण्याला प्राधान्य मिळाले. यातच स्मार्टफोनचे स्टोअरेज वर्षानुक्रमे वाढतच असल्याने आयपॉड उपकरणाला कुणी विचारेनासे झाले. स्वस्त स्मार्टफोनमध्ये आयपॅडपेक्षा जास्त गाण्यांचा संग्रह शक्य असल्याने ते उपकरण मागे पडत गेले. यातूनच आता आयपॅड शफल आणि आयपॅड नॅनो यांच्यासारख्या लोकप्रिय मॉडेलची विक्री बंद करण्यात आली आहे. अर्थात आयपॅड या गॅजेटसाठी ती मृत्यूघंटा मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here