आपण जे पाहू त्याचाच ध्वनी ऐकवणारा स्मार्ट गॉगल !

0

चष्म्याचा उपयोग करून आपण पाहू शकतो हे सांगण्याची कुणाला गरज नाही. तथापि, आता बोस या कंपनीने युजरला त्याच्या भोवतालचे आणि तेदेखील तो पाहिल तेच ध्वनी ऐकवण्याची सुविधा असणारा स्मार्ट गॉगल विकसित केला आहे.

बोस ही कंपनी ध्वनी उपकरणांच्या निर्मितीत जगभरात आघाडीवर समजली जाते. याच कंपनीने आता जगातील पहिला ऑडिओ एआर (ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी) अर्थात ध्वनी विस्तारीत सत्यता ही सुविधा असणारा स्मार्ट ग्लास (चष्मा) विकसित केला आहे. याबाबत कंपनीने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीमध्ये सत्याला कल्पनेचे पंख लावता येतात. यात वास्तवातील घटनांना एका नवीन लेअरच्या माध्यमातून यात हवे ते काल्पनीक घटक टाकणे शक्य आहे. अर्थात हा झाला व्हिज्युअल एआर. आता याच पध्दतीने बोस कंपनीने ऑडिओ एआर प्रणाली विकसित केली आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात आपल्या भोवतालच्या ध्वनीला हव्या त्या पध्दतीने ऐकण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी यात मानेच्या हालचालींना अचूकपणे ओळखणारे ट्रॅकींग प्रणाली आणि जीपीएसचा वापर करण्यात आला आहे.

खरं तर, बोस कंपनी ऑडिओ एआरसाठी स्वतंत्र हेडफोन विकसित करू शकत होती. तथापि, याऐवजी बोस कंपनीने स्मार्ट ग्लास तयार केले आहेत. या चष्म्यात अतिशय उत्तम दर्जाचे मायक्रोफोन असून ते भोवतालच्या ध्वनीला युजरपर्यंत पोहचवतील. याची खासियत म्हणजे हा गॉगल घालणारा व्यक्ती ज्या दिशेला तोंड फिरवेल त्या दिशेचा ध्वनी त्याला ऐकू येईल. म्हणजेच ऑडिओ ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी या प्रणालीत दिशेवर आधारित ध्वनी ऐकण्याची सुविधा मिळेल. तर याला स्मार्टग्लास व अ‍ॅपची जोड दिल्यास आपण जे पाहू तेच ऐकण्याची धम्माल आपल्याला अनुभवता येणार आहे. बोस कंपनी अन्य डेव्हलपर्ससाठी याचा ‘एपीआय’ लवकरच सादर करणार आहे. यामुळे कुणीही ऑडिओ ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित अ‍ॅप्स वा उपकरणे विकसित करू शकेल. यावर आधारित उपकरणांमध्ये स्मार्ट गॉग्लससह स्मार्ट हेल्मेट, हेडफोन्स/इयरफोन्स आदींचा समावेश असेल.

बोस कंपनीच्या ऑडिओ एआर प्रणालीचा आपल्याला अतिशय धम्माल उपयोग करता येईल. म्हणजे आपण हा स्मार्ट गॉगल घालून एखाद्या इमारतीकडे पाहिले तर आपल्याला त्या वास्तूशी संबंधीत सर्व माहिती (ध्वनीच्या स्वरूपात) मिळेल. यातून वाहतुकीचे विविध अलर्ट, हवामानाची माहिती आदी माहितीपणे मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here