आता फेसबुक स्टोरीजवर येणार जाहिराती

0

फेसबुक या सोशल साईटसह मॅसेंजरवर लवकरच स्टोरीज या फॉर्मेटमध्ये जाहिराती दिसणार असून याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे.

कधी कधी कॉपी करणारा हा त्या संकल्पनेच्या जनकापेक्षा अधिक यश संपादन करत असल्याची काही उदाहरणे आपल्याला माहित असतील. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्टोरीज या फिचरबाबतही असेच घडले आहे. हे मूळ फिचर स्नॅपचॅट या खास करून टिन एजर्समध्ये तुफान लोकप्रिय असणार्‍या अ‍ॅपने कार्यान्वित केले होते. तथापि, फेसबुकची मालकी असणार्‍या इन्स्टाग्राम, फेसबुक व फेसबुक मॅसेंजर तसेच व्हाटसअ‍ॅपवर याची हुबेहूब कॉपी करण्यात आली. आणि आज स्नॅपचॅटपेक्षा कित्येक पटीने स्टोरीज हे फिचर फेसबुकच्या समूहात वापरले जात आहे. या अनुषंगाने फेसबुकने जाहीर केलेली ताजी आकडेवारी ही उदबोधक आहे. सध्या फेसबुकसह फेसबुक मॅसेंजरवर दररोज सुमारे ३० कोटी युजर्स स्टोरीज फिचरचा वापर करतात. इन्स्टाग्रामवरील ४० कोटी तर व्हाटसअ‍ॅपवरील ४५ कोटी युजर्सदेखील याचा वापर करत आहेत. गमतीची बाब अशी की, स्नॅपचॅटवर स्टोरीजचे सुमारे १३.५ कोटी दैनंदिन युजर्स आहेत. अर्थात कॉपी करणार्‍या फेसबुकसह या ग्रुपमधील कंपन्यांनी स्नॅपचॅटला केव्हाच मागे टाकले आहे. दरम्यान, ही आकडेवारी जाहिर करतांनाच फेसबुकने एक महत्वाची घोषणादेखील केली असून ती सोशल मीडियावर दूरगामी परिणाम करणारी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेसबुकने आता आपल्या सोशल नेटवर्कींग साईटसह फेसबुक मॅसेंजरच्या स्टोरीज या फॉर्मेटमध्ये जाहिराती देण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर फेसबुकच्या न्यूजफिडमध्ये जाहिरातींचा विपल वापर करण्यात येत आहे. तर मॅसेंजरवरही मर्यादीत प्रमाणात का होईना, जाहिराती प्रचलीत झाल्या आहेत. मात्र आता दोन्ही ठिकाणी स्टोरीज या प्रकारातील जाहिराती दिसणार आहेत. हा जाहिरातींचा नवीन प्रकार लवकरच जगभरातील जाहिरातदारांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. न्यूजफिडमधील जाहिरातींपेक्षा याचे दर हे कमी राहतील असे मानले जात आहे. तथापि, फेसबुकने याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

जाणून घ्या स्टोरीज म्हणजे काय ?

फेसबुकच्या वेब आणि अ‍ॅप या दोन्ही आवृत्त्यांसाठी स्टोरीज हे फिचर देण्यात आलेले आहे. यामध्ये कुणीही प्रतिमा, व्हिडीओ आणि ध्वनी यांचा मिलाफ करू शकतो. कोणत्याही युजरने आपली स्टोरीज अपलोड केल्यानंतर ती २४ तासांपर्यंत कायम राहते. यानंतर मात्र ही स्टोरी आपोआप नष्ट होते. स्टोरीज या फिचरच्या माध्यमातून अतिशय सृजनशील पध्दतीत आपल्याला हवा तो संदेश पोहचवण्याची सुविधा आहे. आता याचमध्ये जाहिराती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here