आता दोन नॉचयुक्त स्मार्टफोन दाखल

0

शार्प कंपनीने अ‍ॅक्वोज आर२ कॉम्पॅक्ट हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून याच्या डिस्प्लेवर दोन नॉच देण्यात आले आहेत.

सध्या फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्लेंची स्पर्धा अगदी टोकावर पोहचली आहे. यामुळे डिस्प्लेवर अन्य बाबींना अगदी कमीत कमी स्थान मिळून युजरला पूर्ण स्क्रीन वापरता यावा यासाठी कंपन्यांचा आटापीटा सुरू झाला आहे. यासाठी डिस्प्लेवर नॉच अस्तित्वात आला. आयफोन-एक्स या मॉडेलमध्ये याला पहिल्यांदा देण्यात आले. यानंतर अगदी मिड रेंजमधील स्मार्टफोनमध्येही याची कॉपी करण्यात आली आहे. यानंतर अलीकडेच वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉचदेखील समोर आला. अर्थात याच नॉचचा प्रकार अजून मर्यादीत झाला. तर काही कंपन्यांनी नॉच विरहीत अर्थात खर्‍याखुर्‍या अर्थाने फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्लेदेखील सादर केले आहेत. यातील फ्रंट कॅमेरा हा पॉप-अप स्लायडरच्या सहाय्याने वापरता येतो. एकीकडे या घडामोडी घडत असतांना शार्पने अ‍ॅक्वोज आर२ कॉम्पॅक्ट हे मॉडेल लाँच केले आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात एक नव्हे तर दोन नॉच देण्यात आलेले आहेत. हे दोन्ही नॉच वर आणि खालील बाजूस दिलेले आहेत. यातील वरील नॉचमध्ये फ्रंट कॅमेरा व सेन्सर दिले असून खालच्या नॉचमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. अर्थात डबल नॉच हा या मॉडेलचा युएसपी असेल हे स्पष्ट झाले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, अ‍ॅक्वोज आर२ कॉम्पॅक्ट या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर ८४५ हा प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिली आहे. यात क्विकचार्ज ३.० चा सपोर्ट असणारी २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइड ९.० पाय आवृत्तीवर चालणारे आहे. याच्या पुढील बाजूस एफ/२.२ अपर्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिला आहे. तर याच्या मागील बाजूस एफ/१.९ अपर्चरयुक्त २२.६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. पहिल्यांदा हे मॉडेल जपानमध्ये मिळणार असून नंतर याला अन्य देशांमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

पहा :- शार्प अ‍ॅक्वोज आर२ कॉम्पॅक्ट या स्मार्टफोनची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here