आता अँड्रॉइड प्रणालीवरील स्कूटर

0

अर्कोज या कंपनीने अँड्रॉइड प्रणालीवर आधारित स्कूटर बाजारपेठेत उतारली असून यात अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

वाहनांमध्ये अँड्रॉइड प्रणालीचा वापर आता वाढू लागला आहे. चारचाकींमध्ये अँड्रॉइड ऑटो या प्रणालीच्या माध्यमातून स्मार्टफोनला कनेक्ट करण्याची सुविधा आधीच प्रदान करण्यात आली आहे. तर अ‍ॅपल कंपनीनेही अ‍ॅपल कार प्ले ही प्रणाली सादर केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, अर्कोज या फ्रेंच कंपनीने जगातील प्रथम अँड्रॉइड स्कूटर सादर केली आहे. सिटी कनेक्ट या नावाने हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. यात ५ इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात नेव्हिगेशनसह स्कूटरच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा डिस्प्ले वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ असल्यामुळे कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला असून याची रॅम १ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके आहे. यात थ्री-जी नेटवर्क कनेक्टीव्हिटी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत प्रणालीवर चालणारे आहे. या स्कूटरमधील डिस्प्लेवर नेमक्या कोणत्या सुविधा असतील हे कंपनीने जाहीर केलेले नाही. तथापि, प्राप्त माहितीनुसार यात गुगल मॅप्सच्या माध्यमातील नेव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक, विविध नोटिफिकेशन्स आदींचा समावेश असू शकतो. तसेच हा डिस्प्ले युजरच्या स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता सिटी कनेक्ट स्कूटर या मॉडेलमध्ये २५० वॅट क्षमतेची मोटर तर ३६ वॅट क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर २५ किलोमीटरपर्यंत चालू शकते. तर याचा वेग अधिकतम २५ किलोमीटर प्रति-तास असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात रिजनरेटीव्ह ब्रेकिंग या प्रकारातील ब्रेक देण्यात आले आहेत. या मॉडेलमध्ये अ‍ॅल्युमिनीयमची फ्रेम दिलेली असून ही स्कूटर १०० किलोग्रॅमइतके वजन वाहून नेण्यास समर्थ असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यातील टायर्स हे पंक्चरप्रूफ या प्रकारातील आहेत. मात्र यात बसण्यासाठी आसन व्यवस्था नसून युजरला उभे रहावे लागणार आहे. या स्कूटर मॉडेलचा प्रोटोटाईप जगासमोर सादर करण्यात आला असून हे मॉडेल येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार्‍या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात येणार आहे. बाजारपेठेत ही स्कूटर ४९९.०० युरो (सुमारे ३९२०० रूपये) इतक्या मूल्यात उपलब्ध करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here