अ‍ॅप स्टोअर @ १० : जाणून घ्या महत्वाचे टप्पे

0
अ‍ॅप स्टोअर, app store

अ‍ॅपलचे अ‍ॅप स्टोअर आज १० वर्षांचे झाले असून याचे औचित्य साधून अ‍ॅपलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून आपल्या आजवरच्या वाटचालीला उजाळा दिला आहे.

आयफोनचे तंत्रज्ञानाच्या इतिहासातील स्थान किती महत्वाचे आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. याच प्रकारे आयफोनची युटिलिटी आणि अर्थातच लोकप्रियता वाढवण्यासाठी अ‍ॅप स्टोअरने महत्वाची भूमिका पार पाडली. खरं तर, आयफोनच्या आगमनाआधीच एचटीसी, ब्लॅकबेरी आणि नोकियासारख्या कंपन्यांनी ‘स्मार्ट’ म्हणता येईल असे मॉडेल्स लाँच केले होते. तथापि, ‘आयफोन १’ हा खर्‍या अर्थाने पृथ्वीवरील पहिला लोकप्रिय स्मार्टफोन ठरला. यानंतर काय झाले तो इतिहास आपल्यासमोर आहे.

आयफोन हा अ‍ॅपलनेच विकसित केलेल्या आयओएस या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. यावर चालणारे सर्व अ‍ॅप्लीकेशन्स हे युजरला एकाच ठिकाणावरून इन्स्टॉल करता यावे यासाठी अ‍ॅप स्टोअर अस्तित्वात आले. प्रारंभी यावर फक्त आणि फक्त मोफत अ‍ॅप्स होते. यानंतर ‘इन-अ‍ॅप परचेस’ची सुविधा देण्यात आली. आज जगभरातील डेव्हलपर्ससाठी अ‍ॅप स्टोअर हे कमाईचे एक उत्तम साधन झाले आहे. तर युजर्ससाठी एकाच ठिकाणी विविध अ‍ॅप्लीकेशन्सच एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे त्यांचीही सुविधा झालेली आहे. अवघ्या दहा वर्षातच हे सर्वाधीक उलाढालीचे जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर स्टोअर बनले आहे. जगातील तब्बल १५५ देशांमध्ये हे स्टोअर उपलब्ध आहे.

आज दर आठवड्याला तब्बल ५० कोटी युजर्स अ‍ॅप स्टोअरला भेट देत असतात. यात गेमींग हा भाग सर्वात लोकप्रिय आहे. अर्थात या विभागाला सर्वाधीक युजर्स व्हिजीट देत असतात. अर्थातच गेमींग आणि याच्या जोडीला एंटरटेनमेंट या प्रकारांमध्ये सर्वाधीक कमाई होत असते. जगभरात तब्बल दोन कोटी आयओएस डेव्हलपर्स आहेत. तर अ‍ॅप स्टोअरच्या माध्यमातून लक्षावधींना रोजगार मिळाला आहे. आज या स्टोअरवर मोफत आणि प्रिमीयम या दोन्ही प्रकारातील अ‍ॅप्लीकेशन्सचा समावेश आहे. या दोन्ही विभागांमध्ये समान प्रकारात घडामोडी होत असल्याचे अ‍ॅपलने अधिकृतपणे जाहीर केले आहे. आज जगभरात आयओएस प्रणालीवर चालणारी सुमारे १.३ अब्ज उपकरणे असून या सर्वांमध्ये अ‍ॅप स्टोअर वापरले जात आहे.

पहिल्या दिवशी अ‍ॅप स्टोअरवर फक्त ५०० अ‍ॅप्स होते. आज हाच आकडा २२ लाखांपेक्षा जास्त इतका आहे. गुगलच्या प्ले स्टोअरवर सुमारे ३८ लाख अ‍ॅप्स आहेत. तथापि, कमाईत अ‍ॅप स्टोअर आघाडीवर आहे. अ‍ॅपलने सातत्याने काळाचा वेध घेतला आहे. यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाशी अनुकुल असणारे अ‍ॅप्लीकेशन्स सातत्याने या स्टोअरवर दाखल होत असतात. अलीकडच्या कालखंडाचा विचार केला असता, विस्तारीत सत्यता म्हणजे ‘ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी’ व आभासी सत्यता म्हणजे ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ या प्रकारांमधील अ‍ॅप्स हे मोठ्या प्रमाणात अ‍ॅप स्टोअरवर दाखल होत आहेत. विविध स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करतांना सुरक्षा हा मुद्दा खूप महत्वाचा असतो. या अनुषंगाने अ‍ॅपलने आपल्या या स्टोअरवर सायबर सिक्युरिटीला प्राधान्य दिले आहे. यामुळे युजर निर्धास्तपणे विविध अ‍ॅप्सचा वापर करू शकतात.

दरम्यान, अ‍ॅप स्टोअरच्या दशकपूर्तीनिमित्त जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅप स्टोअरच्या माध्यमातून जगभरातील डेव्हलपर्सच्या सृजनाला आपण नवीन आयाम दिल्याचे नमूद केले आहे. याच्या जोडीला जगात मोबाईल-फर्स्ट या प्रकारातील व्यवसायाला हातभार लावल्याचेही अ‍ॅपलचे म्हणणे आहे. याशिवाय, गेमींग, लाईव्ह स्ट्रीमिंग, इन-अ‍ॅप परचेसींगवर आधारित व्यावसायिक प्रणाली, ज्ञान, माहिती, मनोरंजन, शिक्षण, आरोग्य आदींसाठीही अ‍ॅप स्टोअर उपयुक्त ठरले असल्याचा दावा अ‍ॅपलतर्फे करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here