अ‍ॅपल आणि इरॉसमध्ये हातमिळवणी ?

0

अ‍ॅपल कंपनी देशातल्या मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या इरॉसशी हातमिळवणी करणार असल्याचे वृत्त असून हा ‘मेगा करार’ लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

इरॉस ही भारतातील मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून त्यांच्याकडे तब्बल तीन हजार हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचे हक्क आहेत. आता अ‍ॅपल कंपनी या सर्वांचे डिजीटल हक्क मिळवणार असल्याच्या हालचाली सुरू असून यासाठी सुमारे एक अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल ६३८२ कोटी रूपयांचा करार होण्याची शक्यता आहे. या संदर्भात दोन्ही कंपन्यांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी येत्या काही दिवसांत याची घोषणा होऊ शकते. या करारात इरॉसची ऑन डिमांड व्हिडीओ सेवा असणार्‍या ‘इरॉस नाऊ’चादेखील समावेश आहे. अर्थात हा करार झाल्यानंतर ‘इरॉस नाऊ’ची मालकी अ‍ॅपलकडे येणार असल्याचे स्पष्ट आहे.

भारतातील ऑन डिमांड व्हिडीओ सेवा ही सध्या प्राथमिक अवस्थेत असली तरी यात खूप मोठी संधी आहे. अन्य क्षेत्रांपेक्षा यात जलद गतीने वाढ होतांना दिसत आहे. भारतात सध्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार, वुठ, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, जिओ टिव्ही आदी ऑन डिमांड व्हिडीओ सेवांनी बाजारपेठेतील मुख्य वाटा काबीज केला आहे. तर दुसरीकडे अ‍ॅपल कंपनीने अ‍ॅपल म्युझिक ही आपली स्ट्रीमिंग सेवा भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. मात्र भारतकेंद्रीत ‘कंटेंट’ अभावी खूप प्रयत्न करूनही ही सेवा फारशी लोकप्रिय झालेली नाही. विशेष करून ‘गाना’ आणि ‘सावन’ सारख्या तुलनेत लहान असणार्‍या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत पकड घेतली असतांना अ‍ॅपल म्युझिकला आलेले अपयश हे या कंपनीसाठी चिंतेचा विषय आहे. यामुळे व्हिडीओ क्षेत्रात प्रवेश करण्याआधी अ‍ॅपल कंपनीने सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने इरॉसकडे असणार्‍या चित्रपटांच्या खजिन्याची मदत घेत, अ‍ॅपल आपली स्वत:ची ऑन डिमांड व्हिडीओ सेवा सादर करून या स्पर्धेत उडी घेण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here