असुस विवोबुक एस१५ आणि झेनबुक युएक्स ४३० भारतात दाखल

0

असुस कंपनीने बियाँड द एज कार्यक्रमाअंतर्गत भारतात विवोबुक-एस-१५ व झेनबुक युएक्स ४३० या मॉडेल्सला भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे.

नवीन झेनबुक आणि विवोबुक बारीक आणि वजनाने हलके आहेत. हे दोन्ही लॅपटॉप विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये इंटेलने अलीकडेच जाहीर केलेले आठव्या पिढीतले अत्यंत गतीमान असे प्रोसेसर्स असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे ५९,९९० आणि ७४,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहेत.

असुस विवोबुक एस १५ हे मॉडेल १५.६ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. यात अवघ्या ७.८ मिलीमीटर आकाराची कडा असेल. या डिस्प्लेचा १७८ अंशात वापर करणे शक्य आहे. यात २.१ गेगाहर्टझ् इंटेल कोअर आय ७-८५५०यू हा अद्ययावत प्रोसेसर असून याला एनव्हिडीया एमएक्स१५० या ग्राफीक कार्डची जोड असेल. याची रॅम १६ जीबीपर्यंत तर स्टोअरेजसाठी एक टेराबाईटपर्यंतचे पर्याय असतील. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही बॅटरी फास्ट चार्जींग तंत्रज्ञानामुळे ४९ मिनिटांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असेल. यात ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीसह युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, युएसबी ३.१ आदी फिचर्स असतील

असुस झेनबुक युएक्स४३० या मॉडेलमध्येही १४ इंची फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) अँटी ग्लेअर डिस्प्ले असेल. यात २.१ गेगाहर्टझ् इंटेल कोअर आय ७ हा प्रोसेसर असून याची रॅम १६ जीबीपर्यंत तर स्टोअरेजसाठी ५१२ जीबीपर्यंतचे पर्याय असतील. यात हर्मन कार्दोनचे स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत. यात ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीसह युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, युएसबी ३.१ आदी फिचर्स असतील. हे दोन्ही लॅपटॉप ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here