असा असेल रिलायन्सचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन !

0

रिलायन्स जिओ लवकरच अवघ्या पाचशे रूपयात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टयुक्त स्मार्टफोन लाँच करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून याचे फिचर्सही लीक झाले आहेत.

गत काही महिन्यांपासून रिलायन्स जिओ अत्यंत स्वस्त मूल्यात फोर-जी स्मार्टफोन लाँच करणार असल्याची माहिती होती. अलीकडेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जुलै रोजी हे मॉडेल ग्राहकांना सादर करण्यात येईल असे वृत्त समोर आले होते. तर ताज्या लीक्समधून याचे विविध फिचर्स समोर आले आहेत. यानुसार अवघे पाचशे रूपये मूल्य असणारा हा स्मार्टफोन जिओच्या सेवेला कनेक्ट करता येईल. अर्थात यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. जिओने आधीच डाटा मूल्यात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत दहा कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. तर या स्मार्टफोनच्या माध्यमातून जिओ अन्य हँडसेट उत्पादकांची झोप उडविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या लिक्सनुसार रिलायन्स जिओच्या या स्मार्टफोनमध्ये २.४ इंच आकारमानाचा कलर डिस्प्ले असेल. याची रॅम ५१२ एमबी तर इनबिल्ट स्टोअरेज चार जीबी असेल. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे. या स्माटफोनमध्ये खास करून अत्यंत किफायतशीर दराच्या फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्कसाठी विकसित करण्यात आलेला स्नॅपड्रॅगन २०५ प्रोसेसर असेल. फायरफॉक्स ऑपरेटींग सिस्टीमपासून विकसित करण्यात आलेल्या काई ओएस या प्रणालीवर हे मॉडेल चालणार आहे. तर यासाठी खास काईओएस अ‍ॅप या नावाचे स्टोअर असेल. यात दोन मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा असेल. या मॉडेलची बॉडी प्लॅस्टीकपासून तयार केलेली असेल. तर यात देण्यात आलेला टी-९ हा कि-बोर्ड इंग्रजीसह देवनागरी लिपीला सपोर्ट करणारा असेल. यामध्ये जिओचे बहुतांश अ‍ॅप कार्यान्वित करता येतील. २१ जुलै रोजी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या फोनचे अनावरण करण्यात येईल असे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here