अरे व्वा…व्हाटसअ‍ॅपवर आपोआप नष्ट होणारे संदेश पाठविता येणार !

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

आपण व्हाटसअ‍ॅपवरून पाठविलेला एखादा मॅसेज हा समोरच्याच्या इनबॉक्समधून आपोआप डिलीट झाल्यास किती मज्जा येईल नाही ! अर्थात आजवर स्वप्नवत वाटणारे हे फिचर लवकरच व्हाटसअ‍ॅपच्या युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवर आधीच ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ हे अतिशय उपयुक्त फिचर दिले आहे. याचा वापर करून कुणीही एखादा ग्रुप अथवा वैयक्तीच चॅटींगच्या माध्यमातून पाठविलेला मॅसेज डिलीट करू शकतो. पहिल्यांदा याला अवघ्या काही मिनिटांच्या मर्यादेसह सादर करण्यात आले होते. यानंतर याची मर्यादा १ तास ८ मिनिटे आणि १६ सेकंदापर्यंत वाढविण्यात आली आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये हीच मर्यादा तब्बल १३ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आधीच समोर आली आहे. अर्थात, ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ या फिचरचा वापर करण्यासाठी संबंधीत युजरला स्वत: त्याने पाठविलेला मॅसेज डिलीट करावा लागतो. ही प्रक्रिया मॅन्युअल आहे. मात्र हेच काम स्वयंचलीत म्हणजेच अ‍ॅटोमॅटीक पध्दतीने झाल्यास युजरची चांगलीच सुविधा होऊ शकते. आता आनंदाची बातमी अशी आहे की हे फिचर लवकरच व्हाटसअ‍ॅपवर वापरता येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच ‘इफॅमरल मॅसेजींग’ अर्थात आपोआप नष्ट होणार्‍या मॅसेजची सुविधा देणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. विविध टेक पोर्टल्सने याबाबत वृत्त दिले आहेत. हे फिचर म्हणजे स्नॅपचॅट या टिन एजर्समध्ये लोकप्रिय असणार्‍या अ‍ॅपच्या लोकप्रिय फिचरची कॉपी असेल हे स्पष्ट झाले आहे. व्हाटसअ‍ॅपने आधीच स्नॅपचॅटच्या ‘स्टोरीज’ची नक्कल केली आहे. ही नक्कल व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला चांगलीच भावली असून आज दररोज तब्बल ४५ कोटींपेक्षा जास्त युजर्स याचा वापर करत आहेत. याच्या पाठोपाठ इफॅमरल मॅसेजींगची सुविधेची नक्कलदेखील करण्यात येणार आहे. यात कुणीही समोरच्या युजरला मॅसेज पाठविल्यास तो विहीत कालखंडानंतर आपोआप नष्ट होणार आहे. स्नॅपचॅटवर याची मर्यादा २४ तासांची दिलेली आहे. तर व्हाटसअ‍ॅपवर ही मर्यादा नेमकी किती असेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, या प्रकारातील मॅसेजसाठी काही मिनिटांपासून ते २४ तासापर्यंतच्या टायमरचे पर्याय देण्यात येतील असे मानले जात आहे. तसेच वैयक्तीक चॅट व ग्रुप्स या दोन्ही प्रकारात ही सुविधा मिळणार की नाही? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा झाल्यावरच सर्व चित्र स्पष्ट होणार हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here