अरे व्वा…आता नवीन सीमकार्ड न घेतांनाही मिळणार मोबाईल क्रमांक !

0

डीओटी म्हणजेच ‘डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन’ने आज भारतीय ग्राहकांसाठी ई-सीमची सुविधा सादर केली असून याच्या अंतर्गत आता कुणाही युजरला नवीन सीमकार्ड न घेतांनाही नवीन मोबाईल क्रमांक मिळणार आहे.

‘डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन’ने आज देशभरातील सेल्युलर कंपन्यांसाठी नवीन दिशा-निर्देश जारी केले आहेत. यासोबत नाविन्यपूर्ण फिचर्स देण्यात आले आहेत. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे एंबीडेड सबस्क्रायबर आयडेंटीटी मॉड्युल अर्थात ई-सीम हे होय. सध्या आपल्याला नवीन मोबाईल क्रमांक हवा असल्यास नवीन सीमकार्ड घ्यावे लागते. तथापि, ई-सीममुळे नवीन सीमकार्ड घेण्याची गरज उरणार नाही. तर ग्राहकाला त्याच्या विद्यमान उपकरणातच ते इनबिल्ट अवस्थेत देण्यात येणार आहे. ग्राहक त्याला हव्या असणार्‍या सेल्युलर सेवा पुरवठादार कंपनीसाठी याला अ‍ॅक्टीव्हेट करू शकतो. यामुळे आगामी काळात इनबिल्ट ई-सीम असणारी विविध उपकरणे बाजारपेठेत दाखल होऊ शकतात. याचा खास करून स्मार्टवॉचसारख्या वेअरेबल्स अर्थात परिधान करण्याजोग्या उपकरणांमध्ये ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. यात एक वा दोन मोबाईल क्रमांक मिळवता येणार आहे.

रिलायन्स जिओ आणि एयरटेलने अलीकडेच भारतात अ‍ॅपल वॉच सेरीज-३ हे स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. यात ई-सीम ही सुविधा आहे. या पार्श्‍वभूमिवर, डीओटीचे हे निर्देश अतिशय महत्वाचे मानले जात असून यामुळे अ‍ॅपल वॉचच्या ग्राहकांना आता आपल्या वॉचमधील ई-सीम अ‍ॅक्टीव्हेट करता येणार आहे. तसेच हे ई-सीम त्यांच्या स्मार्टफोनमधील सीमकार्डला संलग्नदेखील करू शकणार आहे. दरम्यान, डिओटीच्या नवीन निर्देशानुसार एक व्यक्ती आपल्या नावावर जास्तीत जास्त १८ सीमकार्ड खरेदी करू शकणार आहे. (आधी ही मर्यादा ९ इतकी होती.) यात ९ मोबाईल सीम आणि ९ ई-सीमचा समावेश असणार आहे.

आगामी कालखंडात एम-टू-एम म्हणजेच ‘मशिन-टू-मशिन’ आणि आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रांमध्ये प्रचंड घडामोडींचे संकेत आहेत. यात स्मार्टफोनशी कनेक्ट असणार्‍या उपकरणांची संख्या वाढणार आहे. यामुळे केंद्र सरकारने ई-सीम प्रणालीचे धोरण जाहीर केल्याचे प्रतिपादन आज ‘डीओटी’तर्फे करण्यात आले. यासाठी सेल्युलर कंपन्यांना ‘केवायसी’च्या माध्यमातून ग्राहकाची खातरजमा करण्याचे अधिकारदेखील देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here