अरेच्चा…हा आहे जगातील पहिला लवचीक स्मार्टफोन

0

रॉयल कार्पोरेशन या कंपनीने जगातील पहिला लवचीक स्मार्टफोन सादर केला असून या माध्यमातून अनेक मातब्बर कंपन्यांना मात दिली आहे.

लवचीक अथवा घडी होण्याजोगा स्मार्टफोन तयार करण्याची स्पर्धा कधीपासूनच सुरू झालेली आहे. यात सॅमसंग, हुआवे, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन तयार करण्याची माहिती आधीच समोर आली आहे. याआधी झेडटीई कंपनीने अ‍ॅक्झॉन एम हा फोल्डेबल फोन सादर केला असला तरी याला बाजारपेठेत फारसा प्रतिसाद लाभला नाही. तर मध्यंतरी सॅमसंग या प्रकारातील मॉडेल तयार करत असून याची लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली होती. कंपनीने याला दुजोरादेखील दिला आहे. एकीकडे जगभरातील दिग्गज कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू असतांना रॉयल कार्पोरेशन या डिस्प्लेचे उत्पादन कंपनीने रॉयल फ्लेक्सपाय हा लवचीक स्मार्टफोन सादर केला आहे. याला अगदी कशाही पध्दतीने घडी करून वापरता येत असून या प्रकारातील हे जगातील पहिले मॉडेल आहे. याच्या मध्यभागी बिजागरे नसून याचा डिस्प्लेच लवचीक असल्यामुळे घडी घालता येत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे.

फ्लेक्सपाय या स्मार्टफोनमध्ये ७.८ इंच आकारमानाचा लवचीक डिस्प्ले देण्यात आला आहे. याला घडी केल्यानंतर हा डिस्प्ले ४ इंच आकारमानापर्यंत कमी होतो. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८१५० हा प्रोसेसर आहे. याची रॅम ६ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी आहे. तर दुसरे व्हेरियंट हे ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेज असे आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यात २० आणि १६ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील एक कॅमेरा हा टेलीफोटो लेन्स या प्रकारातील आहे. फोल्ड न करता वापरल्यास हे रिअर कॅमेरे म्हणून तर फोल्ड केल्यानंतर फ्रंट कॅमेरे म्हणून वापरता येणार आहेत. यातील बॅटरी ३,८०० मिलीअँपिअर क्षमतेची असून याला फास्ट चार्जींगचा सपोर्ट देण्यात आला आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइड पाय या आवृत्तीवर आधारित वॉटर ओएस या प्रणालीवर चालणारे आहे. भारतीय चलनानुसार याचे बेसिक व्हेरियंट हे ९५ हजार रूपये मूल्याचे आहे.

पहा : या लवचीक स्मार्टफोनची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here