अरेच्चा सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये आहेत पाच कॅमेरे !

0
सॅमसंग गॅलेक्सी ए९ (२०१८),samsung-galaxy-a-9-2018

सॅमसंगने तब्बल पाच कॅमेर्‍यांनी युक्त असणारा आपला गॅलेक्सी ए९ हा स्मार्टफोन आज बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अन्य उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

गत अनेक दिवसांपासून गॅलेक्सी ए९ (२०१८) या स्मार्टफोनबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे. याच्या मागील बाजूस चार तर समोर एक असे एकूण पाच कॅमेरे असतील असे अनेक लीक्स आधीच समोर आलेले होते. यामुळे या औत्सुक्यात अजूनच भर पडली होती. या अनुषंगाने आज क्वालालंपूर येथील कार्यक्रमात सॅमसंगने आपल्या या नवीन उच्च श्रेणीतील स्मार्टफोनचे अनावरण केले. वर नमूद केल्यानुसार याच्या मागील बाजूस तब्बल क्वॉड-कॅमेरा अर्थात चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा हा २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यामध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/१.७ अपर्चरचा समावेश आहे. यातील दुसरा कॅमेरा १० मेगापिक्सल्सचा असून यामध्ये एफ/२.४ अपर्चर, वाईड अँगल लेन्स आणि २एक्स ऑप्टीकल झूम प्रदान करण्यात आला आहे. यातील तिसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून यामध्ये तब्बल १२० अंशाच्या अल्ट्रा वाईड अँगलचा समावेश आहे. तर यातील पाचवा कॅमेरा हा एफ/२.२ अपर्चरयुक्त असून या डेप्थ सेन्स कॅमेर्‍याची क्षमता ५ मेगापिक्सल्सची आहे. याच्या मदतीने बोके इफेक्ट देता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.० अपर्चरयुक्त २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या सर्व कॅमेर्‍यांमध्ये सॅमसंग कंपनीने विकसित केलेले इंटिलेजीयंट कॅमेरा हे फिचर दिलेले आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस असणार्‍या चार कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उच्च दर्जाच्या प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामुळे दर्जेदार कॅमेरे ही या मॉडेलची खासियत मानली जात आहे.

अन्य फिचर्सचा विचार केला असता, सॅमसंग गॅलेक्सी ए९ (२०१८) या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर दिलेला आहे. याच्या रॅमचे ६ व ८ जीबी असे दोन पर्याय दिलेले असून इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असणार आहे. हे इनबिल्ट स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारा असून यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन पहिल्यांदा मलेशियात मिळणार असून लवकरच याला भारतात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here