अरेच्चा…या स्मार्टफोनमध्ये असतील पाच कॅमेरे !

0
एलजी व्ही ४० थिनक्यू, lg v30 thinq
(एलजी व्ही ४० थिनक्यू मॉडेलचे लीक झालेले छायाचित्र)

एलजी कंपनी लवकरच पाच कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा स्मार्टफोन लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

कॅमेरा हा कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात महत्वाचा घटक असल्याची बाब कुणाला नाकारता येणार नाही. यामुळे प्रत्येक कंपनी आपल्या मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचा कॅमेरा असावा याकडे लक्ष देत असते. खरं तर, याची मोठी स्पर्धाच सुरू असल्याचेही आता दिसून येत आहे. अलीकडे ड्युअल कॅमेरा सेटअप लोकप्रिय झालेला आहे. याचा वापर करून अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेता असल्यामुळे आता किफायतशीर मूल्य असणार्‍या स्मार्टफोनमध्येही ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जात आहे. तर काही कंपन्या सेल्फीसाठीही याच प्रकारचा सेटअप देत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, एलजी कंपनी आपल्या आगामी व्ही४० थिनक्यू या मॉडेलमध्ये एकंदरीत पाच कॅमेरे देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे मॉडेल या कंपनीच्या आधीच्या एलजी व्ही३०ची पुढील आवृत्ती असणार असून यामध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. अर्थात यात सर्वात लक्षणीय बदल हे कॅमेर्‍यांमध्ये असणार आहे.

एलजी व्ही४० थिनक्यू या मॉडेलच्या मागील बाजूस २०, १६ आणि १३ मेगापिक्सल्स क्षमतांच्या तीन कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला असेल. यातील एक सुपार वाईड अँगल लेन्सयुक्त तर दुसरा सुपर टेलिफोटो लेन्स या प्रकारातील असणार आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांमधून एकत्रीतपणे प्रतिमा अथवा चलचित्र घेता येणार आहेत. या इमेजेस व व्हिडीओ हे अधिक सजीव भासणारे असून यातील रंगसंगती ही अतिशय दर्जेदार असेल असे मानले जात आहे. यात दर्जेदार झूमची सुविधासुध्दा असणार आहे. तर याच्या पुढील बाजूस ड्युअल कॅमेर्‍यांची सुविधा देण्यात येणार आहे. अ‍ॅपलचा फेस आयडी या फिचरप्रमाणे यामध्ये थ्री-डी फेस स्कॅनींग हे वैशिष्ट्यपूर्ण फिचर असू शकते. अर्थात यातून घेण्यात येणारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगदेखील अतिशय उत्तम दर्जाचे असतील ही बाब उघड आहे.

एलजी व्ही ४० थिनक्यू या मॉडेलमधील अन्य फिचर्सचा तपशील समोर आलेला नाही. तथापि, यातील रॅम आणि स्टोअरेज हे उच्च श्रेणीतील अन्य मॉडेल्सनुसारच असू शकतात. सूत्रांनी दिलेली माहिती आणि विविध लीक्सचा विचार केला असता, हा स्मार्टफोन पुढील महिन्याच्या प्रारंभी अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे. ग्लोबल लाँचींगनंतर हे मॉडेल लागलीच भारतात उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here